कल्याण : पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत मोरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. प्रशांत मोरे यांचं 2015 साली डोंबिवलीच्या स्नेहा मोरे यांच्याशी लग्न झालं होतं.


मात्र लग्नानंतर सतत काही ना काही कारणावरून ते आपला छळ करत होते, तसेच आपले अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी देत होते, असा आरोप स्नेहा मोरे यांनी केला आहे. याबाबत पत्नीच्या तक्रारीनुसार डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला.


प्रशांत मोरे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं अखेर पोलिसांनी त्यांना पुण्याच्या सैन्यतळावरून अटक केली. त्यांना आज कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान, मोरे यांची आजवर जिथे जिथे पोस्टिंग झाली, तिथे तिथे त्यांनी अनेक महिलांना नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.


रामनगर पोलीस सध्या याबाबत कसून तपास करत आहे. दरम्यान, या सगळ्याबाबत स्नेहा मोरे यांना विचारलं असता, प्रशांत मोरे यांचं पतीची दुष्कृत्य समोर आणायची असल्यानं हे पाऊल उचलल्याचं त्या म्हणाल्या. सोबतच सैन्याचं नाव आपल्याला खराब करायचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कॅमरासमोर बोलण्यास मात्र स्नेहा मोरे यांनी नकार दिला.