मुंबई : देशभरात सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या फटाकेबंदीची नागरिकांनी ऐशीतैशी केल्याचं लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिसून आलं. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याची वेळ रात्री 8 ते 10 ठरवून दिली होती. मात्र मुंबईकर रात्री 10 नंतर देखील फटाके फोडत होते. पोलिसांनी 10 वाजेनंतर फटाके फोडणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतलं.


मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर पोलिसांचा बंदोबस्त असल्याने आठच्या आधी कुणी फटाके फोडले नाहीत, मात्र दहा वाजून गेल्यानंतरही काही जण त्याठिकाणी फटाके फोडतांना आढळले.


नियमाचं उल्लंघन करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. एकूण सात लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.


नवी मुंबईतही मोठे आवाज करणाऱ्या फटाक्यांवर खारघर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. फटाके विकणाऱ्या दुकानांवर जाऊन दोन हजार, पाच हजारच्या फटाक्यांच्या माळा दुकानदारांकडून ताब्यात घेण्यात आल्या.


हिंदूंच्या सणांवरच निर्बंध का येतात?


तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कोर्टाचे नियम धुडकावत कुटुंबासह फुल टू दिवाळी सेलिब्रेशन केलं. हिंदूंचे सण आले का निर्बंध येतात, असं म्हणत राऊत त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत 'आठ ते दहा'च्या मर्यादेशिवाय फटाके फोडले.