मुंबई : नुकतेच कर्करोगाचे निदान झालेली अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर यांच्या मृत्यूच्या अफवांनी पुन्हा एकदा सर्वांना घाबरवले. किरण खेर यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याच्या बातमीनंतर, दुसऱ्यांदा अशाप्रकारे त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या आहेत. एबीपी न्यूजशी बोलताना अनुपम खेर यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यू संदर्भात उडणाऱ्या अफवांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले आहे.
किरण खेरबद्दल एबीपी न्यूजशी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, अशा अफवा मला अस्वस्थ करतात, यामुळे मानसिक त्रासही होत आहे. अचानक जेव्हा मित्र आणि नातेवाईकांचे रात्री दहानंतर मला फोन येतात आणि किरणच्या प्रकृतीविषयी मला विचारण्यात येते. तेव्हा यांना अचानक काय झालंय? हे असे प्रश्न का विचारतायेत हे मला कळत नाही. पण आता या अफवांबद्दल काय करता येईल?"
रक्ताच्या कर्करोगाशी लढणारी आपली पत्नी किरण खेर यांच्या आरोग्यविषयक माहिती देताना अनुपम खेर यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, "सध्या तिची तब्येत चांगली आहे. तिच्यावर सुरु असलेले उपचार फार कठीण आहेत, महिन्यात दोनदा केमोथेरपी घेण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात जावं लागतंय. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर खूप चांगले आहेत. परदेशातूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत."
किरण खेर यांच्या मृत्यूची अफवा 07 मे रोजी पुन्हा एकदा पसरल्यानंतर अनुपम खेर यांचे मित्र, जवळचे, नातेवाईक आणि हितचिंतक यांचे सतत फोन येत होते. अशा परिस्थितीत अनुपम खेर यांनी अशा सर्व अफवांना फेटाळून लावत ट्विटरवर किरण खेरशी संबंधित आरोग्यविषयक अपडेट दिले.
अनुपम खेर यांनी रात्री 11.25 वाजता ट्विट केलं करत लिहलं की, "किरणच्या तब्येतीबद्दल अफवा सुरू आहेत. या सर्व खोट्या अफवा आहेत. ती अगदी चांगली आहे. तिने आज दुपारी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मी लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या नकारात्मकत बातम्या पसरवू नका." धन्यवाद. "