मुंबई : राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा आहे. 45 वर्षांवरील वयोगटातील पाच लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले डोस 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, "राज्यात आतापर्यंत 1 कोटी 84 लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. केंद्राकडून 45 वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांसाठी लसी येत आहेत. पाच लाख नागरिक कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. तर कोविशील्ड लसीच्या प्रतीक्षेत 16 लाख जण आहेत. या क्षणाला कोवॅक्सिन लसीचे केवळ 35 हजार डोसच उपलब्ध आहेत. 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिन लसीचे पावणे तीन लाख डोस उपलब्ध आहेत तर केंद्राने दिलेले 35 हजार डोस आहेत. हे सर्व डोस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरले जाणार आहेत.


याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोललो. दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असलेल्यांसाठी लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी केली. त्यामुळे 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस 45 वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरली जाणार आहे. याबाबत राज्याच्या कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा करुन तूर्तास 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण काही दिवस स्लो डाऊन करावं लागेल, असं राजेश टोपे पुढे म्हणाले.


रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्के : राजेश टोपे
दरम्यान राज्यात पाच लाख 90 हजार कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जमेची बाजू म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्के आहे. शिवाय टेस्टिंग कमी झालेली नाही. दररोज दोन लाख चाचण्या होते, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.