गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ड्रग्ज विरोधात राज्य आणि केंद्राच्या पथकाने छापेमारी करत कारवाया सुरु केल्या आहेत. एकीकडे NCB ने मुंबईत ड्रग्जविरोधी कारवाई सुरु केली असतानाच आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानेही मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने सायनमध्ये 22 कोटी रुपयांच्या किंमतीचं हेरॉईन जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी सायंकाळी सायन येथून 22 कोटी रुपये किंमतीचं सात किलो हिरॉईन जप्त केलं आहे. याप्रकरणी एका महिला ड्रग्स सप्लायरलाही अटक करण्यात आलं आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात घाटकोपर युनिटने सायन परिसरात छापेमारी केली होती. त्यानंतर यामध्ये एका महिलेला सात किलो हिरॉइनसह बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थान, प्रतापगड परिसरातून मुंबई पोलिसांची टीम गेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. NDPS (Narcotic-Drugs-and-Psychotropic-Substances-Act) कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी मुंबई पोलिसांकडून याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
दरम्यान, दहा ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील न्हावा शेवा पोर्टवर DRI नं २५ किलो पेक्षा जास्त हेरॉइन जप्त केलं होतं. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. तेलाच्या कॅनमध्ये अफगाणिस्तानातून नवी मुंबईत हेरॉइनची तस्करी करण्यात आली होती.
सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; मुंबई क्राइम ब्रांचची कारवाई
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने सोमवारी सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड केला. या रॅकेटमध्ये महिलांना वेश्या व्यवसायात काम करायला लावलं जायचं. विशेष म्हणजे यात महिला ग्राहकांसह भारतभर फिरण्यासाठी जायच्या. टूरवर कपल म्हणून अशा महिलांना ग्राहकांसोबत पाठवलं जायचं. मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 7 ला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. मुंबई एअरपोर्टवर क्राइम ब्रांचच्या विशेष पथकानं सापळा रचत दोन महिलांना अटक केलं.