मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आरोपी कसे संपर्क साधायचे याबाबतचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येचा मास्टरमाइंड गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद असलेला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई असल्याचे मुंबई गुन्हे शाखेने उघड केले आहे आणि त्याने सिग्नल ॲपचा वापर करून आतापर्यंत अटक केलेल्या 26 आरोपींशी आणि दोन फरार आरोपी शुभम आणि जीशान यांच्याशी संपर्क साधल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
अनमोलने सिग्नल ॲपद्वारे कॉलिंग आणि मेसेजिंगद्वारे सर्व आरोपींचे...
सूत्रांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, क्राइम ब्रँचच्या तपासादरम्यान असेही समोर आले की, शुभम, जीशान अख्तर, आकाशदीप गिल या तीन नेमबाजांशी त्याने सर्वाधिक संपर्क साधला होता. क्राईम ब्रँचच्या माहितीनुसार, या काळात अनमोलने सिग्नल ॲपद्वारे कॉलिंग आणि मेसेजिंगद्वारे सर्व आरोपींचे ब्रेनवॉश केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनमोलने त्यांना सांगितले होते की, तो "धर्म आणि समाजाच्या भल्यासाठी बाबा सिद्दीकी यांची हत्या करणार आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खान, दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित आहेत आणि दोघांनी मिळून अनुज थापनची हत्या केली आहे."
अनमोलला ‘भाऊ’ म्हणून हाक मारायचे
आरोपपत्रानुसार, संभाषणादरम्यान सर्व आरोपी अनमोलला ‘भाऊ’ म्हणून हाक मारायचे. आरोपपत्रानुसार, अनमोलने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्व आरोपींना मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. शुभम लोणकर भारतात कुठेतरी लपून बसला आहे आणि गुन्हे शाखेची काही पथके त्याच्या शोधात आहेत, असा दावा गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुन्हा केला.
मनी ट्रेलमध्ये आणखी खुलासे
अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून पंजाबमधून अटक करण्यात आलेला आरोपी आकाशदीप गिल याने सिद्दीकी यांच्या हत्येसाठी पैशांची व्यवस्था केल्याचा आणखी एक खुलासा आरोपपत्रात झाला आहे. अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून आरोपी गिलने पैशांची व्यवस्था केली आणि त्यानंतर फरार आरोपी शुभम लोणकर याला तीन लाख रुपये पाठवले. अटक आरोपी सलमान वोहरा याच्या नावाने कर्नाटक बँकेत उघडलेल्या खात्यातून शुभम लोणकर याला हे पैसे मिळाले होते.त्यानंतर अनमोल बिश्नोईच्या सूचनेवरून शुभम लोणकर याने महाराष्ट्रातून बाबा सिद्दिकीच्या हत्येतील अन्य आरोपींना ही रक्कम पाठवली.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी यूपीमधून मिळालेल्या निधीचा मनी ट्रेल जोडण्यातही गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून शूटर शिवकुमार गौतम, अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाश श्रीवास्तवच्या चार मित्रांनी आपल्या स्तरावर पैशाची व्यवस्था तर केलीच पण सीडीएममार्फत जमाही केली. कॅश डिपॉझिट मशीन) याद्वारे तीन शूटर्स आणि इतर आरोपींना लाखो रुपये पाठवले.अनमोलने या चौघांना बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या बदल्यात अनेक पट पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. शिवकुमारसह चौघांना बहराइचमधून अटक करण्यात आली.