Temperature Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट झाली होती. पहाटे हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक कुडकुडले होते. आता येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी बहुतांश राज्यात घटलेलं किमान तापमान वाढू लागलंय. आता रविवारपासून मुंबईत किमान तापमान घसरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईत शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. (Mumbai Temperature) शुक्रवारच्या तुलनेत तापमान काहीसं घटलं होतं. दरम्यान, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. किमान तापमान वाढले आहे.
मुंबईकरांना तापमानात दिलासा
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी घामाच्या धारांसह प्रचंड उकाड्याला नागरिक सामोरं जातायत. गेल्या आठवड्यात कमाल तापमान 35 अंशांपर्यंत जाऊन ठेपलं होतं. मागील दोन दिवसांपासून पहाटेचा गारवा वाढलाय.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. आता कमाल आणि किमान तापमानात आजपासून 2-3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबईत 35 अंशांपर्यंत गेलेला कमाल तापमानाचा पारा 28-30 अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे. (IMD Weather Update)
शनिवारी मुंबईत कमाल तापमान काहीसे घटले होते.कुलाबा केंद्रात 28 अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदवले गेले. तर सांताक्रूझ येथे 30.2 अंश सेल्सियस एवढे कमाल तापमान होते. मुंबईत बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आर्द्रता वाढली असून तापमान घटलं आहे. पुढील काही दिवस तापमानात ही घट कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाल्याने ढगाळ वातावरण आहे. परिणामी किमान तापमान वाढला आहे. येत्या 24 तासात थंडीचा जोर कमी होणार असून किमान तापमान 3 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात किमान तापमानाची सामान्य तापमानाहून 1 ते 3 अंशांनी अधिक नोंद झाली. राज्यात येत्या दोन दिवसात पावसाला पोषक हवामान तयार झालं असून विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला जपण्याचा सल्ला प्रादेशिक हवामान केंद्राने दिलाय. (IMD Rain Alert)
हेही वाचा:
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..