मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या टोरेस घोटाळा प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. टोरेस ज्वेलरीकडे जो व्यक्ती अनेक गुंतवणूकदार जोडेल त्याला कार भेट दिल्या होत्या. टोरेसनं 14 महागड्या कार गिफ्ट स्वरुपात दिल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यासाठी  एक कार शेजारच्या शोरुममधून 11 हजार रुपये भाडं देऊन आणली होती. ती कार दादरच्या कार्यालयात काचेत ठेवण्यात आली होती. जो कंपनीनं दिलेलं टारगेट पूर्ण करेल त्याला ती कार मिळेल, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. ज्यामुळं लोक या घोटाळ्यात अडकत गेले.  


मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या चौकशीत आतापर्यंत 24 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उलगडा झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दररोज शोरुम आणि आरोपींच्या घरांची झडती घेतली आहे. फक्त दादरच्या कार्यालयातून  5 कोटी रुपयांची रोकड आणि 4 कोटी रुपयांचं सोनं, चांदी आणि काही खडे जप्त करण्यात आले आहेत. दादरच्या कार्यालयातून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या प्रकरणी आतापर्यंत 700 जणांनी तक्रारी दिल्या आहेत. 


जे लोक टोरेस शोरुममधून डायमंड खरेदी करतील त्यांना दर आठवड्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाईल असं सांगितलं होतं. एका महिन्यात  10 ते 15 टक्के लाभांश दिला जाईल, असंही सांगण्यात आलं होतं. याशिवाय एखाद्यानं दुसरा ग्राहक जोडल्यास त्यावर देखील इन्सेटिव्ह देऊ असं सांगण्यात आलं होतं. खोट्या डायमंडसह एक प्रमाणपत्र देखील गुंतवणूकदारांना दिलं जायचं. 


पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. ज्यामध्ये तानिया कसातोव्हा, वॅलेंटिना कुमार, सर्वेश सुर्वे यांचा समावेश आहे. जॉन कार्टर, ओलेना स्टोइन आणि विक्टोरिया हे फरार आहेत.


टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं दादर, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण आणि गिरगाव परिसरात कार्यालयं  उघडली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीत दादरमध्ये कार्यालय सुरु झालं होतं. कंपनीनं पाँझी स्कीम चालवून गुंतवणूकदारांना चुना लावल्याचं समोर आलं आहे. हा घोटाळा समोर येताच मुंबई पोलिसांकडून या कंपनीची बँक खाती सील करण्यात आली आहेत. भाईंदरच्या कार्यालयातील तिघांना देखील अटक करण्यात  आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


इतर बातम्या :


Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच