ST Workers Strike Live Updates : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतरही राज्यभरात कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा कामगारांना आवाहन केलं आहे. अनिल परब यांनी म्हटलं की,  हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे, असं परब म्हणाले. 


ST Workers Strike: एसटी महामंडळाकडून संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका, हायकोर्टानं दिले 'हे' निर्देश


त्यांनी म्हटलं की, कारवाई करण्याची इच्छा नाही. संप मागे घ्या,  हा संप कोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे.  काही राजकीय पक्ष पोळी भाजून घेत आहेत.  पडळकर व खोत कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का? जर कामावर नसतील तर पगारही होणार नाही.  संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल, असंही परब म्हणाले. 


 ST Workers Strike Live Updates : लालपरी ठप्प! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन, वाचा प्रत्येक अपडेट


त्यांनी म्हटलं की, विलिनीकरणाची मागणी एक दोन दिवसांत होणार नाही. सरकार कुठेही कमी पडलेले नाही. कोर्टाला आम्ही लेखी दिले आहे. हा मुद्दा राजकीय पक्षांनी लावून धरलेला आहे. भाजप खतपाणी घालतंय. कामगारांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.  निलंबनाची कारवाई वाट पाहूनच केली. घाईत केलेली नाही. कामगारांनी कमिटीसमोर म्हणणं मांडावं. सर्व खाजगी बसचालकांना स्टेज कॅरिजची परवानगी दिलीय, असंही परब म्हणाले. 


परब म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही पालन केलंय. एसटी कर्मचाऱ्यांनीही पालन करावं. लोकांना वेठीस धरु नये. कुणी भडकवत असेल तर त्यांना बळी पडू नका. मागण्या चर्चा करुन पूर्ण करु असं आश्वासन दिलं होतं. हा संप बेकायदेशीर आहे. पुन्हा विनंती आहे की, आपण कामावर यावं. कामगारांच्या नुकसानीला जबाबदार हे भाजप नेते असतील. विलिनीकरण करण्याची मागणी एक दोन दिवसात पूर्ण होणारी नाही, त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल 12 आठवड्यात देणार आहे. आपण कामावर या, चर्चेतून मार्ग काढू, असं आवाहन देखील अनिल परब यांनी केलं आहे. 


 



मंत्रालयाची सुरक्षा वाढवण्यात आली   
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोर मोर्चा काढला जाणार आहे. मात्र या मोर्च्याला कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही.  त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आलेली आहे मंत्रालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.  मंत्रालय परिसरात जमा होणारे एसटी कर्मचारी कार्यकर्ते यांना आझाद मैदानात पोलीस घेऊन जात आहेत.  शिवाय कुठल्याही प्रकारे मंत्रालयासमोर आंदोलन होऊ नये आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मंत्रालयाबाहेर लावण्यात आला आहे. 


एसटी प्रशासनाची संपाच्या विरोधात कारवाईला सुरुवात
एसटी प्रशासनाची संपाच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. ठाण्यातील खोपट डेपो मधील कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह  बंद केले आहे.  सर्व कर्मचाऱ्यांना आपले कपडे आणि बॅगा घेऊन बाहेर काढले आहे. खोपट डेपो मॅनेजर यांनी दोन्ही विश्रांतीगृहांना टाळे ठोकले आहे.  


आंदोलनकर्त्यांना वाशी टोल नाक्यावर अडवलं


दरम्यान, आझाद मैदानाकडे जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांना वाशी टोल नाक्यावर अडवलं जातंय. 50 आंदोलनकर्त्यांना वाशीत नवी मुंबई हायस्कुलमध्ये ठेवण्यात आलंय. 50 आंदोलनकर्त्यांमध्ये महिलांचाही सहभाग आहे. दुसरीकडे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी मुंबईत दाखल होत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्यासाठी मज्जाव करणार हे लक्षात घेऊन अनेक डेपोतील कर्मचारी रात्रीच मुंबईत दाखल झाले आहेत.