Sanjay Raut Live : महाराष्ट्रात पाव ग्रॅम ड्रग्ज शोधणाऱ्यांनी 350 कोटींच्या ड्रग्जचा अभ्यास करावा असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावला आहे. त्याचबरोबर ही चिंतेची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रामध्ये ड्रग्जवरुन रणकंद सुरु असतानाच गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. ज्यात हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा समावेश आहे. यापूर्वी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. यावर आज संजय राऊतांनी भाष्य केलं.
राऊत म्हणाले की, द्वारकेत ड्रग चिंतेचे गोष्टी आहे. राज्यात पाव ग्रॅम सापडले. आता वानखेडेंनी तिकडे पाहावे. आता त्यात गुजरातमधील श्रीमंतांची मुलं, सिनेसृष्टीतील लोकं आहेत का ते एनसीबीनं पाहावं, असंही ते म्हणाले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेली चिखलफेक थांबवा असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मलिक यांचं कौतुक करून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मलिक यांचं कौतुक केलं. त्यामुळं मलिक यांच्या लढाईला नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे. शेवटी सत्याचाच विजय होईल आणि सत्य आमच्या बाजूने आहे, असं ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, बर्नार्ड शॉ आम्ही वाचत नाही. आम्ही कुसुमाग्रज वाचतो. पण चांगले आहे, लोकं वाचायला लागली आहेत. बर्नाड शॉचा दाखला फडणवीसांनी दिला आहे. या निमित्ताने लोक वाचायला लागले ही चांगली गोष्ट आहे. यंदाचे साहित्य संमेलन बहारदार होईल, असंही ते म्हणाले.
एसटी आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, एसटी महामंडळं सरकारमध्ये विलिनीकरणं चुकीचं आहे असं भाजप नेते मुनगंटीवार देखील म्हणाले. हे तात्काळ शक्य नाही. भाजपमधील काही हवशे, नवशे, गवशे हे यावर नाचत आहेत. त्यांच्या नाचण्यानं कामगारांचे प्रश्न सुटतील तर सुटतील, असं राऊत म्हणाले. राऊत म्हणाले की, कामगारांच्या समस्या सुटण्यापेक्षा राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. एसटी कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनू नये. कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, असंही ते म्हणाले.