नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख
अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा दिला आहे.
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.
अनिल देशमुख यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021
Breaking Live Update | अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा
दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर देण्यात आली आहे. तर उत्पादन शुल्क खाते अजित पवार यांच्याकडे जाणार आहे. उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रीपद स्वीकारावे. पण सरकारचे किती दिवस शिल्लक आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी लगावला
अनिल देशमुख हे मनोहर जोशी यांच्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्री झाले, त्यावेळी त्यांच्याकडे शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. आणि राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण ची सुरुवात त्यांच्याच कार्यकाळात झाली होती.
गृहमंत्र्यांचा राजीनामा महाविकास आघाडी सरकार पारदर्शक असल्याचा पुरावा - बच्चू कडू
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडी सरकार पारदर्शक असल्याचा पुरावा असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा त्यांच्यावरील लावलेल्या आरोपांची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शी व्हावी यासाठी दिला आहे. तर विदर्भातील मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे का? या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी यात कोणताही प्रांतवाद दिसत नसल्याचं म्हटलंय.
आमदार रवी राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने नैतिक जबाबदारी दाखवत राजीनामा दिला, त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा.आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे आता दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.