Andheri East By Election : राज्यसभेनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतांची जुळवाजुळव सुरु आहे. अशातच राजकीय वातावरण तापले असतानाच आणखी एका निवडणुकीसंदर्भातील माहिती समोर आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये मुरजी पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजेतय. मुरजी पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, पण त्यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सुत्रांनी सांगितलेय.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. येथे लवकरच पोटनिवडणुका पार पडणार आहेत. भाजपकडून या मतदारसंघात तयारीसाठी आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी दिली आहे. याबाबत आज भाजपची बैठक झाली. यामध्ये भाजपकडून मुरजी पटेल यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांना निवडणुकीची तयारी करण्याबाबत सूचनाही देण्यात आली आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. 2019 मध्ये झालेल्या निवडणूकीत या मतदारसंघात भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा वचवा काढण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
हा मदतारसंघ शिवसेनेसाठीही महत्वाचा आहे. कारण, पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याधर्तीवर शिवसेनेकडून तयारी करण्यात येत आहे. ही जागा पुन्हा एकदा जिंकण्याचा मानस शिवसेनेचा असेल. त्यामुळे ही पोटनिवडणुकी अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
मुरजी पटेल यांचा अल्प परिचय -
2012 मध्ये काँग्रेसमधून मुरजी पटेल यांची पत्नी केशरबेन मुरजी पटेल नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2015-2016 मध्ये मुरजी पटेल यांनी पत्नी केशरबेन मुरजी पटेल यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. 2017 मध्ये मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजपच्या वॉर्ड 81 मधून मुरजी पटेल नगरसेवक म्हणून निवडून आलेत, तर वॉर्ड नंबर 76 मधून त्यांची पत्नी केशरबेन मुरजी पटेल निवडून आल्या. 2018 मध्ये जातीच्या खोटा प्रमाणपत्र प्रकरणामध्ये दोन्ही जणांची पदं रद्द झाली होती.
2019 विधानसभामध्ये भाजप आणि शिवसेनाची युती झाल्यामुळे शिवसेनाचे दिवंगत उमेदवार रमेश लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मधून तिकीट मिळाले. त्यामुळे नाराज मुरजी पटेल 2019 विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे होते. त्यावेळी मुरजी पटेल यांना 45808 मत मिळाली होती. तर शिसेवना आमदार रमेश लटके यांना 62,772 मते मिळाली होती. 2019 विधानसभा निवडणुकीत 16,964 मतांनी रमेश लटके विजयी झाले होते. 2020 मध्ये मुरजी पटेल यांना भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाचे महामंत्री पद देण्यात आले.