मुंबई: मुंबई-पुणेदरम्यानच्या एसटी प्रवासाचा वेळ आता कमी होण्याची शक्यता आहे. कारण राज्य परिवहन महामंडळाकडून मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसेस शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून (Atal Setu) चालवाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे शिवनेरी बसेस (Shivneri Bus) अटल सेतूवरुन नेण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने या मार्गावरील शिवनेरीचे नवे थांबे, टोलचा खर्च आणि या मार्गावरुन शिवनेरी चालवणे कितपत व्यवहार्य ठरेल, याविषयी विचार सुरु आहे. या सगळ्या चर्चेअंती आता एसटी महामंडळाकडून मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरुन प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाऊ शकते.


एसटी महामंडळाने यासाठी एक सूत्र निश्चित केल्याचे समजते. शिवनेरी बस मुंबईतून सुटताना त्यामध्ये ४५ प्रवाशी असतील तर बस अटल सेतूवरुन नेण्यात येईल. तसे झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी होऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात शिवनेरी बसच्या मुंबई-पुणे (Mumbai to Pune) प्रत्येकी फेऱ्यांमागे एक फेरी अटल सेतूवरुन चालवण्याचे नियोजन सुरु आहे. दादर-शिवडी-अटल सेतू-उलवे- पनवेल-पुणे असा या शिवनेरी बसचा मार्ग असेल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


शिवनेरी बस अटल सेतूवरुन गेल्यास किती वेळ वाचणार?


शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू सुरु झाल्यापासून मुंबई-पुणे शिवनेरी बस या मार्गावरुन चालवण्याच्या मागणीने जोर धरला होता. मुंबईहून अवघ्या २० मिनिटांत सिग्नलमुक्त मार्गाने चिर्ले येथे पोहोचणे शक्य होणार आहे. चिर्लेहून ६० किमी अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे. त्यादृष्टीने एसटी महामंडळाने या मार्गावरुन बस चालवण्याची चाचपणी सुरु केली होती. अटल सेतूच्या मार्गाने  पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी भरते. याशिवाय, वाहतूक कोंडीची समस्या विचारात घेतल्यास शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेल्यास प्रवासाचा वेळ साधारण तासाभराने कमी होऊ शकतो. मात्र, मुंबईतून अटल सेतूवर प्रवेश केल्यास मुंबई-पुणेदरम्यान पनवेल एसटी स्थानक वगळावे लागणार आहे. पनवेलसह अन्य लहान-मोठे थांबेही घेता येणार नाही. त्यामुळे प्रवाशी हा पर्याय कितपत मान्य करतील, हे पाहावे लागेल.


आणखी वाचा


'शिवशाही' बसच्या दरात 'शिवनेरी'मधून प्रवास; राज्यात धावणार 'जन-शिवनेरी' बस