मुंबई : मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेनं पुन्हा मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाचे दरवाजा ठोठावले आहेत. विशेष एनआयए न्यायालयाच्या परवानगीनंतर वैद्यकीय उपचारांसाठी वाझेला भिवंडीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र पुढील शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील वोक्हार्ट अथवा बॉम्बे रुणालयात दाखल करण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारा अर्ज वाझेनं दाखल केला आहे. त्या अर्जावर गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.


जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 20 जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरीक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. दरम्यान तळोजा कारागृहात असलेल्या वाझे याला हृदयाशी संबंधित त्रास असल्यानं न्यायालयाच्या परवानगीनंतर 30 ऑगस्ट रोजी त्यांना भिवंडी येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र तिथं वैद्याकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिय करण्याची गरज निर्माण झाल्यानं आपल्यावर मुंबईतील बड्या रुणालयात वैद्याकीय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्या, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.


वाझे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टीचा सल्ला दिलाय. मात्र वाझे हे बायपास सर्जरी करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे एनआयए यावर काय भूमिका घेते यावर कोर्टाचे याबाबतचे निर्देश अवलंबून असतील.


संबंधित बातम्या :