मुंबई : अनिल देशमुखांनीच सीबीआयचा प्राथमिक तपास अहवाल लीक केल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयच्या सब इन्पेक्टरला आयफोन 12 ची लाच दिली गेली असल्याचं सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये सांगितलं आहे. देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी सीबीआयचे सब इन्पेक्टर अभिषेक तिवारी यांना गिफ्ट दिल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे अनिल देशमुखांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत.
काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या प्राथमिक चौकशीचा एक अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नाही. तसेच सचिन वाझेंना पुन्हा नोकरीमध्ये घेण्याच्या प्रकरणातही अनिल देशमुखांनी कोणताही हस्तक्षेप केल्याचं समोर येत नाही. एकूणच सीबीआयच्या या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुखांना क्लीन चिट देण्यात आली होती.
हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीबीआयवर टीकेची झोड उडवण्यात आली होती. जर अनिल देशमुखांचा या प्रकरणात काही हात नसेल तर मग त्यांच्यावर एफआयआर का दाखल करण्यात आला असा सवालही विचारला जात होता.
या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सीबीआयने एक अंतर्गत चौकशी समिती नेमली. या समितीने तपास केल्यानंतर सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनीच हा अहवाल लीक केल्याचं समोर आलं. अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांनी तिवारी यांना आयफोन 12 प्रो गिफ्ट दिल्याचं तपासात उघडकीस आलं. त्यानंतर आनंद डागा आणि अभिषेक तिवारी या दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं.
अनिल देशमुखांची चौकशी सुरु असताना सीबीआयचा एक कर्मचारी नागपुरातील वकील आनंद डागा यांच्या संपर्कात आला आणि नंतर त्यांचा संपर्क वाढल्याचं सीबीआयच्या तपासात स्पष्ट झालं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून 100 कोटी रुपये वसुली केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने या प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात काही पुरावे मिळाल्यानंतर एफआयआर दाखल केला होता.
संबंधित बातम्या :