मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेनमध्ये एखाद्या रुग्णाच्या नावाने पैसे गोळा करणारे अनेक जण दिसतात. मात्र पैसे गोळा करणारे बरेच जण बोगस असतात. कॅन्सरग्रस्तांच्या नावे पैसे घेऊन ते प्रवाशांची फसवणूक करत असतात. परंतु लोकलमधील सतर्क प्रवाशांनी नुकतंच पैसा गोळा करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश केला. महत्त्वाचं म्हणजे 3 वर्षांच्या मुलाला आर्थिक मदतीची गरज नसतानाही त्यांनी प्रवाशांकडून तब्बल 10 लाख रुपये गोळा केले होते.

 

टाटा मेमोरियलचं बनावट प्रमाणपत्र आणि लहान मुलाचा फोटो दाखवून दोघे जण लोकलमधील प्रवाशांची फसवणूक करायचे. 3 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचं ते प्रवाशांना सांगत आणि त्यांच्याकडून पैसे जमा करायचे. विशेष म्हणजे या मुलाला कोणत्याही मदतीची गरज नव्हती.

 

मुलाच्या उपचाराच्या नावे 10 लाख जमवले

मात्र दोन सतर्क प्रवाशांनी मागील आठवड्यात या दोघांचं पितळ उघडं पाडलं. त्यांची तक्रार केल्यानंतर दोघांनी आणखी दहा सहकाऱ्यांची माहिती पोलिसांना दिली. हे टोळकं टाटा मेमोरियलच्या बनावट प्रमाणपत्र आणि लहान मुलाच्या फोटोसह लोकल ट्रेनमधून प्रवास करायचं. फोटो दाखवून प्रवाशांकडून आर्थिक मदत मागायचे.

 

हरियाणातील उमीद फाऊंडेशचे कार्यकर्ते असल्याचा दावा 12 जणांच्या या टोळक्याने केला आहे. त्यांनी आतापर्यंत मुलाच्या उपचाराच्या नावावर तब्बल 10 लाख रुपये गोळा केले आहेत. मात्र यातील एक रुपयाही टाटा मेमोरियलच्या अकाऊंटमध्ये जमा झालेला नाही.

 

कर्करोग्यांच्या नावे रेल्वेत पैसे गोळा करणारी टोळी अटकेत


 

जागरुक प्रवाशांमुळे टोळीचा पर्दाफाश

नितीन जाधव आणि जितेंद्र देशमुख या दोन सतर्क प्रवाशांनी या टोळक्याचा पर्दाफाश केला. हे दोघोही 12 ऑगस्ट रोजी लोकल ट्रेनने मानखुर्दहून सीएसटीला जात होते. त्यावेळी उमीद फाऊंडेशनचे कार्यकर्ते नितू भगत आणि प्रेमकुमार भगत कॅन्सरग्रस्त मुलासाठी देगणी गोळ करताना दिसले. टाटा मेमोरियलमध्ये या मुलावर उपचार सुरु असल्याचं ते सांगत होते. काही प्रवासी दोघांना पैसे देत असल्याचं पाहिल्यानंतर देशमुखांना संशय आला. लोकल ट्रेनमध्ये अशाप्रकारचं टोळकं कार्यरत असल्याचं बातम्यांमध्ये वाचलं होतं. मीही आधी या लोकांना पैसे द्यायचो. मात्र बातमी वाचल्यानंतर त्यांना पैसे देणं बंद केलं. तसंच हे पैसे खरोखरच रुग्णांपर्यंत पोहोचतात का, असाही विचार डोक्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

 

उमीद फाऊंडेशनचे कार्यकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या दोघांना देशमुख आणि जाधव यांनी काही प्रश्न विचारले. मात्र त्यांची भंबेरी उडाली. टाटा मेमोरियलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दोघांनी ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केलं. मात्र देशमुख आणि जाधव यांनी दोघांनाही पकडलं. तसंच त्यांना रुग्णालयात घेऊ गेले.

 

दुसऱ्याच संस्थेकडून सफ्रुद्दीनवर उपचार

उमीद फाऊंडेशनने तीन वर्षांच्या सफ्रुद्दीनच्या अकाऊंटमध्ये एक रुपयाही ट्रान्सफर न केल्याचं समोर आलं. तसंच नितू आणि प्रेमकुमार यांच्याकडील प्रमाणपत्रही बनावट असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं. इतकंच नाही तर सफ्रुद्दीनचा उपचार दुसरी एक संस्था करत असून त्याच्या कुटुंबीयांना आता आर्थिक मदतीची गरज नाही. सफ्रुद्दीनच्या वडिलांनी सांगितलं की, "टाटा मेमोरियलमध्ये मुलाला घेऊन आल्यानंतर उमीद फाऊंडेशनचे कार्यकर्ते मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भेटले होते. यानंतर मुलाच्या उपचारासाठी पैसा जमा करण्याचं आश्वासन देत त्यांनी मुलाच्या अडमिशन पेपरची कॉपी घेतली. पण माझ्या मुलाचा आजार हा एखाद्याचा पैसे कमावण्याचा मार्ग ठरु शकतो, याची कल्पनाच केली नव्हती."

 

याआधीही पैसे उकळण्याच्या अनेक घटना

दरम्यान, लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या फसवणुकीची ही पहिलीच घटना नाही. गरीब मुलांच्या शाळेसाठी, रुग्णालयासाठी तसंच काही संस्थांच्या नावावर काही महिला आणि पुरुष मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांकडून देणगी मागतात. याच वर्षी मध्य आणि हार्बर मार्गावरील ट्रेनमध्ये 25 हून अधिक अशा घटनांची नोंद झाली आहे. तर पश्चिम मार्गावरील लोकलमध्ये या घटनांची संख्या 15 आहे.