डोंबिवली : जे लोक मागील निवडणुकीत पक्ष सोडून गेले आहेत, त्यांच्यासाठी अजूनही पक्षाची दारं उघडी आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा साद घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस घरवापसीसाठी अनुकूल असल्याचे संकेतच अजित पवारांनी एकप्रकारे दिले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस हा बेरजेचं राजकारण करणारा पक्ष आहे. मागच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले, ते जर आता परत येणार असतील, तर मागच्या वेळी आम्ही घेतलेला निर्णय चुकीचा होता असं म्हणा आणि या, असं अजित पवार म्हणाले. डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी आलेले असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

जिथे राष्ट्रवादी कमकुवत असेल, अशा ठिकाणी जिंकून येण्याच्या दृष्टीने आम्ही इतर पक्षातूनही लोकांना राष्ट्रवादीत घेऊ, पण त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

सध्या देशातलं ढवळून निघालेलं राजकारण पाहता मागील निवडणुकीत भाजपात गेलेले अनेक दिगग्ज स्वगृही परतण्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.