Ajit Dobal Mumbai Visit : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत; बैठकांचं मॅरेथॉन सत्र, काही महत्त्वाच्या गाठीभेटी
Ajit Dobal Mumbai Visit : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत. राज्यपाल, गृहमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही गाठीभेटी.
Ajit Dobal Mumbai Visit : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Dobal) आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. डोवाल यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajnish Seth) यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घातपात करण्याच्या आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज मुंबईत आहेत. दुपारी 1 वाजता डोवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसंच त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. गेल्या काही दिवसांत मुंबईत घातपात घडवण्याच्या काही धमक्या आल्या होत्या. तेव्हापासूनच मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच श्रीवर्धन इथं संशयित बोटीवर सापडलेली एके-47 आणि शस्त्रास्त्रं यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर डोवाल यांच्या या मुंबईतील गाठीभेटींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
मुंबई दौऱ्यावर असणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली. त्यावेळी एक महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यभरातील वरिष्ठ आयपीएस ऑफिसर या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीपूर्वी डोवाल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत 45 मिनिटं चर्चा केली. तसेच, सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचीही भेट घेतली. अजित डोवाल यांचा मुंबई दौरा आणि भेटीगाठींचं सत्र यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, डोवाल यांच्या दौऱ्याकडे अख्या देशाचं लक्ष लागलं आहे.
रायगडमध्ये आढळली होती संशयास्पद बोट
गुरुवारी सकाळी राज्यातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर बोटीवर शस्त्रं सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. या संशयास्पद बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन 'अॅसॉल्ट रायफल', स्फोटकं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.