मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत पोलिसांकडे अश्वदल कार्यरत होतं. 1932 मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. आता 88 वर्षांनी हे युनिट सुरु होतं आहे. इतर राज्यांमध्ये अशा पद्धतीचे अश्वदल होतं. 26 जानेवारी पासून हे युनिट सुरु होणार आहे. या दलामध्ये 30 घोडे असणार आहेत. सध्या मुंबई पोलिसांनी 13 घोडे विकत घेतले असून अजून 17 घोडे विकत घेण्याचा प्रस्ताव आहे. 26 जानेवारी रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या संचलनात 11 घोडे सहभागी होणार आहेत.
घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवता येते. त्यामुळे आंदोलन, जमाव नियंत्रित करण्यासाठी हे अश्वदल महत्वाचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घोड्यावरून येणारे पोलीस हे आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज करणार नाहीत. मात्र घोडे आले की गर्दी आपोआप बाजूला होते, हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
अश्वदलाचा ताफ्यातील अधिकारी, कर्मचारी
या अश्वदलात एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चार हेड कॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. या घोड्यावरील घोडेस्वारांना वाकिटॉकी देण्यात येणार असून समुद्र किनारी दोन घोडे ठेवण्याचा मुंबई पोलिसांचा मानस आहे. मरोळ येथे या घोड्यांना ठेवण्यासाठी पागा तयार करण्यात येणार आहे. सध्या त्यांची तात्पुरती व्यवस्था शिवाजी पार्क येथे करण्यात येणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वारांचं प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
आपत्कालीन स्थितीमध्ये तसेच एखाद्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या गर्दीवर नजर ठेवणे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशा कामांसाठी अश्वदलाचा नक्कीच जास्त उपयोग होईल. याशिवाय मुंबई पोलिसांचं हे अश्वदल येत्या काळात मुंबईकरांचा आकर्षणही ठरू शकतं.