मुंबई : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत. नाईट लाईफबाबत विस्तृत प्रस्तावावर 22 जानेवारी रोजी कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा चर्चा होणारत्यानंतरच नाईट लाईफसंदर्भात योग्य निर्णय होऊ शकेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबाबतचा निर्णय घेतल्यानंतर 26 जानेवारी पासून या निर्णयाची प्रायोगिक तत्वावर अंमलबाजवणी सुरू होणार होती. मात्र अनिल देशमुखांच्या वक्तव्यामुळे 26 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलिसांवर मोठा ताण आहे. पोलीस 12 ते 14 तास रोज काम करत आहेत. इतक्या कमी वेळेत नाईट लाईफ सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा अजून तयार नाही. नाईट लाईफच्या निर्णयानंतर त्यासाठी अतिरिक्त पोलीस आहेत का? याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


सर्व माहिती घेऊन त्याबाबत आढावा घेतला जाईल. मात्र या 26 जानेवारीपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होईल, असं वाटत नसल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे नाईट लाईफच्या निर्णयाची घोषणा करताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घाई केली का? नाईट लाईफबाबतचा निर्णय घेताना संबंधित इतर खात्यांच्या मंत्र्यांशी चर्चा केली नाही का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. महाआघाडीच्या सर्वच नेत्यांना आदित्य ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. मात्र अंमलबजावणीसाठी सर्व स्तरावर त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नाईट लाईफ येत्या 26 जानेवारीपासून सुरु होणार की नाही, हे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.


मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे.



संबंधित बातम्या


आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय, मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर 'नाईट लाईफ' सुरु


अवधूत गुप्ते म्हणाले आदित्यजी हे उत्तर न 'पटनी', आदित्य म्हणाले तुमची 'दिशा' चुकली