मुंबई : मॅरेथॉनमध्ये धावताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने गजानन माजलकर या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉन ओळखली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला. मॅरेथॉनमध्ये यंदा पंचावन्न हजारांहून अधिकजण धावले. पण याच दरम्यान मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.


कार्डिअ‍ॅक अरेस्ट आल्याने 64 वर्षांच्या गजानन माजलकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. धावत असतानाच माजलकर खाली कोसळले, त्यांना तात्काळ बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याशिवाय अन्य सात जणांनाही धावताना हृदयाचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


Mumbai Marathon : महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा

यंदाही इथिओपिआच्या धावपटूंचं वर्चस्व -
देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनमधल्या विविध शर्यतींना आज भल्या पहाटे सुरुवात झाली. मुंबईतल्या गुलाबी थंडीमुळं यंदा मॅरेथॉनच्या वातावरणात मोठा उत्साह दिसून आला. हौशी धावपटूंच्या फुल मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री छगन भुजबळ यानी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला. मॅरेथॉनच्या एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगली. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये इथिओपिआचा धावपटू डेरारा हरीसा विजेता ठरला आहे.

महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा -
हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात पारुल चौधरीनं पहिला क्रमांक पटकावला. मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आली तर नाशिकच्या मोनिका आथरेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या गटचात तीर्थ पुन यानं पहिला क्रमांक पटकावला. मन सिंग दुसरा तर बिलाम्पाला तिसरा क्रमांक मिळाला. एकंदरीतचं मुंबई मॅरेथॉनमधल्या महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंनी आपला ठसा उमटवला.

Mumbai Marathon 2020 | गुलाबी थंडी, बोचरी हवा आणि मॅरेथॉन | ABP Majha