मुंबई : राज्याचं पर्यटन आणि पर्यावरण मंत्रिपद स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिलाच मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर मुंबईत रात्रजीवन (नाईट लाईफ) सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. मुंबईत रात्री सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय झाला आहे.


मागील तीन वर्षांपासून म्हणजे 2017 पासून मुंबईत नाईट लाईफची चर्चा सुरु होती. मुंबई महापालिकेत त्यासंदर्भातली प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निर्णय राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने राज्य शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष होतं. आता मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.


त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे. यासाठी सरकारकडून परिपत्रक जारी केलं जाणार आहे.


भाजपने या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. "मुंबईत हॉटेल, बार, पब 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मिळत आहे. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे, ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल, पब 24 तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल, तर आमचा कडाडून विरोध राहिल", असं ट्वीट माजी मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.





Video | दिशा पटानीबाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे? | ABP Majha