मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील मुंबईतल्या पहिल्या 1 कोटी खर्चून तयार केलेल्या आरामदायी शौचालयाचं युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं. ‘क्लीनटेक’ स्वच्छतागृहासाठी मुंबई महापालिका, जेएसडब्ल्यू ग्रुप, सामाटेक आणि एनपीसीसीए यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला होता. उद्यापासून (2 ऑक्टोबर) हे जागतिक दर्जाचे शौचालय जनतेसाठी खुले होणार आहे.


क्लीनटेक’ वैशिष्ट्ये :

टिकाऊ स्टील : जेएसडब्ल्यू स्टील्सने पुरवलेल्या वेदरिंग म्हणजे हवामानाचा कोणताही परिणाम न होणाऱ्या अशा टिकाऊ स्टील शीट्सपासून या शौचालयाचा मोनोलिथिक फॉर्म बनवण्यात आला आहे. वेदरिंग स्टील हे त्याचा टिकाऊपणा आणि मजबुती यामुळे जगभरातील सुप्रसिद्ध स्मारकांच्या आणि वास्तूंच्या बांधकामात वापरलं जातं. हे शौचालय मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावरच असल्यामुळे खारट हवा, तसेच पावसाळ्यातील लाटांमुळे त्याची कोणतीही झीज होणार नाही, असे बनवण्यात आले आहे. शौचालयाच्या देखभालीसाठी अत्यंत कमी खर्च येईल आणि ते दीर्घकाळ सुरक्षित राहील, अशीच साधनसामुग्री या शौचालयाच्या उभारणीसाठी वापरण्यात आली आहे.

90 टक्के गोडे पाणी वाचवणारे व्हॅक्युम तंत्रज्ञान : स्वच्छतागृहाची सुविधा ही नॉर्वेतील जागतिक दर्जाच्या व्हॅक्युम तंत्रज्ञानावर आधारित असून ती सामाटेकने पुरवली आहे. सर्वसाधारण शौचालयात प्रत्येक फ्लशमागे 7 ते 8 लीटर पाण्याचा वापर होत असताना या शौचालयाच्या प्रत्येक फ्लशमागे 90 टक्के पाण्याची बचत होणार असून एका फ्लशमागे केवळ 0.8 लीटर पाणीच वापरले जाणार आहे. मुंबईसारख्या शहरात जिथे पाणी हे एक दुर्मीळ गोष्ट आहे, तिथे या तंत्रज्ञानामुळे प्रचंड प्रमाणावर गोड्या पाण्याची बचत होणार आहे.

90 टक्के कमी सांडपाणी : सर्वसाधारण शौचालयांच्या तुलनेत या शौचालयातील प्रत्येक फ्लशमागे 90 टक्के पाण्याची बचत होणार असल्यामुळे, साहजिकच या शौचालयातून 90 टक्के कमी सांडपाणी निर्माण होणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह येथील या शौचालयात सर्व सांडपाणी-मैला एका एकात्मिक टॅंकमध्ये जमा करता येणार आहे. 8 हजार वापरकर्त्यांचे सांडपाणी-मैला जमा करण्याची या एकात्मिक स्टोरेज टॅंकची क्षमता आहे.



इंटेलिजेंट सीवेज डिस्पोजल : व्हॅक्युम तंत्रज्ञान आणि कमी सांडपाणी-मैला यांमुळे बृहनमुंबई महापालिकेचे सक्शन ट्रक्स या शौचालयातील सांडपाणी-मैला दर आठवड्याला गोळा करू शकतील आणि त्यांच्या सीवेज ट्रीटमेंट प्रकल्पांमध्ये त्याची विल्हेवाट लावतील. साहजिकच, या शौचालयामुळे दरवर्षी प्रक्रिया न केलेलं अनेक दशलक्ष सांडपाणी मरीन ड्राइव्ह खाडी क्षेत्रात प्रवेश करणार नाही.

सौर उर्जा : जेएसडब्ल्यू एनर्जीने पुरवलेली वक्र सौर पॅनल्स ही शौचालयाच्या वक्राकार छपराला घट्ट बसतील अशी आहेत. हे शौचालय म्हणजे जवळपास एक ‘नेट-झीरो एनर्जी’ सार्वजनिक उपक्रम ठरेल इतकी वीज हे सौर पॅनल्स निर्माण करतील.

वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन : मरीन ड्राईव्ह स्वच्छतागृह सुविधा बनवताना सौदर्यपूर्ण बांधकाम कला आणि इंटेलिजेंट सॅनिटेशन तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. लंबगोलाकार शौचालयावरील मोठ्या आकाराच्या दुहेरी वक्राकार छप्परामुळे बाहेर वाट पाहत असलेल्या नागरिकांना सावलीत उभे राहता येईल. नागरिकांच्या गरजांची पूर्तता करतानाच, या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर एका जागतिक दर्जाच्या स्वच्छतागृहाची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनद्वारे केला गेला आहे.

दरम्यान, एकीकडे मुंबईत स्वच्छतागृहांबाहेर चार-चार तासांच्या रांगा लागत असताना, या रांगांमधील नागरिकांचे वाद होत आहेत, प्रकरणं हाणामारीपर्यंत जात आहेत. सर्वसाधारण स्वच्छतागृह आधी वाढवावीत किंवा त्यांच्या दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या एकीकडे मुंबईकर करत असताना, दुसरीकडे कोट्यवधींचे स्वच्छतागृह बांधले जात आहेत, म्हणून नागरिकांमध्ये काहीसा नाराजीचाही सूर आहे.