मुंबई : खरंतर मागच्या 70 वर्षांत वृक्ष लागवड कशी झाली याची चौकशी व्हायला हवी. बाकी या चौकशीतून काय साध्य होणार हा प्रश्न आहे. या चौकशीत न पडता, चांगली झाडं लावू, ती जगवू, तरुणांना घेऊन ही चळवळ मोठी करण्यात रस आहे, असं मत अभिनेते आणि सह्याद्री देवराई चळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, झाडांची आकडेवारी वाढवणारा नाही तर ती झाडं जगवण्याचा प्लॅन केला पाहिजे. झाडं जगलीत का हे पाहण्यासाठी आम्ही झाडांचे वाढदिवस करणं सुरू केलं. झाडांच्या बाबतीत तरी सर्वांचे हेतू चांगले असायला हवेत, असं सयाजी शिंदे म्हणाले.  वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वर्षभरापूर्वी वृक्ष लागवडीच्या चौकशीची पहिल्यांदा मागणी केली होती, त्या मागणीनंतर प्रचंड खळबळ उडाली होती.

आज यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन चळवळ यशस्वी होणार नाही. जे साध्यच होऊ शकत नाही असं टार्गेट दिलं होतं. त्यामुळे फक्त कागदोपत्री वृक्षलागवड झाली. माणसाला श्वास लागतो आणि घास लागतो, ते झाड देतं. मग झाडांच्या लागवडीत पैसे खाऊन काय मिळणार आहे?, असा सवाल देखील त्यांनी केला.

फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश



 सरकारं बदलत राहतील, चौकशा होत राहतील, यातून काय कोणाला साध्य होणार माहिती नाही. त्यामुळे हे खूप गोंधळाचं काम आहे. यापुढे फक्त धोरणात चुका होऊ नयेत एवढीच अपेक्षा. जी झाडं योग्य नाहीत, पटापट वाढणारी आहेत, आकडेवारीसाठी लावलेली आहेत अशी नाटकं यापुढे होऊ नयेत, असे सयाजी शिंदे म्हणाले.

शेवटी तळमळ कोणाच्यात निर्माण करता येऊ शकत नाही, प्रत्येकाने स्वतःसाठी हे कार्य पुढे नेलं पाहिजे. एक मूल, एक झाड, वृक्ष बँक आणि झाडांचे वाढदिवस हे शाळेपासून कंपल्सरी राबवले पाहिजेत, असे ते म्हणाले.



33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून चळवळ, वनमंत्री मुनगंटीवारांनी सयाजी शिंदेंच्या प्रश्नांची उत्तरं दिली

कारशेडबाबत सयाजी शिंदे म्हणतात...

आरेत जेव्हा 3 हजार झाडं तोडली. तेव्हा मी ठरवलं होतं की 25 हजार देशी वाणाची झाडं तिथं लावणार. दर रविवारी आम्ही ते करतो. पाच हजार झाडं आतापर्यंत लावलीत, असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. आपण सगळ्यांनी एकमेकांकडे बोटं दाखवण्यापेक्षा प्रत्येकाने किमान एक झाड लावावं. याबाबतीत खेड्यातली लोकं बरी आहेत. फक्त त्यांना कळत नाही की ते श्रीमंत आहेत आणि आपल्याला कळत नाही की आपण किती दरिद्री आहोत. कारशेडबाबत माझा अभ्यास नाही, त्यामुळे उठसूट विरोध करणाऱ्यातला मी नाही. मंत्रालयातला भ्रष्टाचार बंद झाला तर महाराष्ट्रातला भ्रष्टाचार बंद होईल. पण ते शोधून काढणं खूप गोंधळाचं काम आहे आणि त्यात मी जात नाही. आपण आपल्यापरीने फक्त चांगलं काम करायचं एवढंच काय ते मी सांगेन, असं देखील सयाजी शिंदे म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळातल्या 50 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी
फडणवीस सरकारच्या काळातल्या 50 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मागच्या सरकारच्या माध्यमातून कोणी किती झाडं लावली? त्यापैकी किती झाडं जगली? यांची सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून चौकशी होणार आहे.



वृक्ष लागवडीची श्वेतपत्रिकाच काढा : सुधीर मुनगंटीवार
वृक्ष लागवड झाली त्यावेळी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होती. वृक्षलागवडीची चौकशी करायला काही हरकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. माजी न्यायाधीशांच्या नेतृत्त्वात चौकशी समितीच नेमा. तसंच राज्यातील शंकाखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिकाही काढा, अशा आशयाचं लेखी पत्र स्वत: देणार आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.