मुंबई: राजकारणात वारसा खूप मोठा असतो. म्हणजे आपल्याकडे उदाहरण घ्यायचं तर राहुल आणि सोनियांना नेहरु आणि इंदिरा गांधींचा वारसा आहे. शरद पवार यशवंतरावांचा वारसा सांगतात. मग वसंतदादा पाटलांचा, विलासराव देशमुखांचा, गोपीनाथ मुंडेंचा, नारायण राणेंचा वारसा सांगत राजकारणात आलेली पहिली दुसरी पिढीही आपण पाहतो. तसा शिवसेनेत बाळासाहेबांना रॅशनलिस्ट असलेल्या प्रबोधनकारांचा वारसा आहे. मग उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे.. आता शिवसेना आणि मनसेतलं वॉर तर सर्वश्रुत आहे. त्यात नव्या ठाकरेची भर पडणार आहे. ते म्हणजे अमित राज ठाकरे....

अमित राज ठाकरे..

हँडसम् आणि रावडी लूकमुळे मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये फेमस आहेत. इन्टाग्राम, फेसबुकवर प्रचंड अॅक्टिव.. राज ठाकरेंच्या सभेत प्रत्येक गोष्ट कुतूहलानं टिपणारा चेहरा.

पण आता हाच चेहरा मनविसेचं नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जातंय.आणि त्यासाठी खास मनसेचे ज्येष्ठ नेते आग्रही आहे. ठाकरे परिवारातील राजकारणात येणारी ही तिसरी पिढी आहे.



उद्धव आणि राज यांच्यानंतर स्वत: बाळासाहेबांच्या उपस्थितीत आदित्यची राजकारणात एन्ट्री झाली होती. त्यानंतर आदित्य युवासेनेचे प्रमुख झाले. गेल्या सात-आठ वर्षात आदित्य यांना राजकारण जवळून बघायला मिळालं.  2014 ची निवडणूक तर सगळ्यात मोठी परीक्षा घेणारी ठरली. त्यामुळेच अमितचीही ग्रँड एन्ट्री व्हावी अशी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे.

मुंबईच्या रुपारेल कॉलेजातून अमितनं पदवी घेतली आहे. पण ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. पण गेल्या काही काळापासून अमितचं ग्रुमिंग आणि पॉलिशिंग सुरु आहे. गेल्याच महिन्यात कोअर कमिटीच्या बैठकीत बाळा नांदगावकर आणि इतर नेत्यांनी अमितवर विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवण्याची मागणी केली. त्यानंतर राज यांनी आधी कार्यकर्त्यांशी जनसंपर्क वाढवण्याचा सल्ला अमितला दिला. ज्याचा परिणाम म्हणून अमित मुंबईतील शाखा पिंजून काढत आहेत. लोकांना भेटताना दिसत आहे. पण त्यानंतरही अमितची तुलना होणार ती चुलतभाऊ आदित्य ठाकरेंशी..



आदित्य आणि अमित

आदित्य ठाकरेंचा जन्म 13 जून 1990 चा आहे, ते 28 वर्षांचे आहेत.

तर अमित ठाकरेंचा जन्म 24 मे 1992 चा आहे, ते 26 वर्षांचे आहेत

आदित्यनं सेंट झेवियर्स कॉलेजातून कला शाखेत पदवी घेतली आहे.

तर अमितनं रुपारेल कॉलेजातून कॉमर्स शाखेतून पदवी घेतली आहे.

आदित्य ठाकरे कवी आहेत, त्यांचा माय थॉट्स इन ब्लॅक अँड व्हाईट 2007 साली प्रकाशित झाला आहे.

तर अमित ठाकरे उत्तम चित्रकार आहेत, राज यांच्याप्रमाणे अमित कार्टूनही रेखाटतात.

आदित्य ठाकरे फुटबॉलचे चाहते आहेत, मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत

तर अमित ठाकरे स्वत: फुटबॉलपटू आहेत, रोनाल्डोला भारतात आणण्यासाठी अमितचा मोठा वाटा होता.

अमित सध्या राज यांच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात. भाषणं लक्षपूर्वक ऐकतात. शाखांना भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांना भेटतायत. सध्या मनसेसाठी सर्वात चॅलेंजिंग काळ आहे. आणि अमित ठाकरेंसाठी राजकारण कठीण धडे शिकण्याचा.



आजारपणातून बाहेर

अमित ठाकरेंनी सोशल मीडियाचाही वापर सुरु केला आहे. 2017 मध्ये महापालिका निवडणुकांच्या काळात ते आजारी होते. मात्र आजारातून बाहेर पडल्यानंतर ते आता सक्रिय राजकारणात दिसून येत आहेत. याचवर्षी त्यांचा बालपणाची मैत्रिण फॅशन डिझायनर मितालीसोबत साखरपुडा झाला आहे. अमित ठाकरे आता विद्यार्थ्यांच्या विषयांना हाताळताना दिसत आहेत.

अमित ठाकरेंनी आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या स्वभावात मोठा फरक असला तरी ते काही गोष्टींमध्ये वडिलांच्या मागे नाहीत. अमित ठाकरेही एक चांगले व्यंगचित्रकार असून स्केचिंगही करतात. ते फुटबॉल प्रेमी असून स्वतः फुटबॉल खेळतात.

फुटबॉल स्टार रोनाल्डिनोला भारतात आणण्यात अमित ठाकरेंची मोठी भूमिका होती. ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेतून राजकारणाची सुरुवात केली, त्याच पद्धतीने अमित ठाकरेही मनसे विद्यार्थी सेनेतून राजकारणात एंट्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती राज ठाकरे यांच्या निर्णयाची...

बाळासाहेबांना राजकारणात घराणेशाही पसंत नव्हती. मात्र त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना राजकारणात लाँच केलं. आदित्यलाही आखाड्यात उतरवलं. आणि आता अमित ठाकरे. अर्थात नवा ठाकरे! ज्याच्यामागे प्रबोधनकार ते राज ठाकरे अशी मोठी लिगसी आहे. आणि या वटवृक्षांच्या गर्दीतून आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचं आव्हानही अमितसमोर आहे.

VIDEO