मुंबई: मुंबईला गेले काही दिवस पावसाने झोडपल्यानंतर दोन दिवस काहीशी विश्रांती घेतली. मात्र येत्या 24 तासात ठाणे आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबईत दुपारी 1 वाजून 1 मिनिटांनी 5 मिटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याच समजतयं. या मोसमातील ही सर्वात मोठी हाय टाईड आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली.
राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर मंदावलाय. काहीशी उघडीप या भागांमध्ये बघायला मिळतेय.
येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.
काल पडलेल्या पावसाची आकडेवारी
कोकण विभागात सरासरी ३२.४ मिमी पाऊस होतो. तिथे ४९.२ मिमी म्हणजे सरासरीच्या ५२ टक्के जास्त पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रात सरासरी ६.९ मिमी पाऊस पडतो. तिथे १२.३ मिमी म्हणजे सरासरीच्या ७८ टक्के जास्त पाऊस नोंदवला गेला.
मराठावाड्यात सरासरी ४.८ मिमी पाऊस होतो. तिथे ४.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या २ टक्के कमी पाऊस झाला. तर विदर्भात सरासरी १२.५ मिमी पाऊस होतो. तिथे २१.३ मिमी म्हणजेच ७१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. संपूर्ण राज्यात सरासरी १० मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा १७.२ मिमी म्हणजेच सरासरीच्या ५९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापुरात मुसळधार
कोल्हापूर जिल्ह्यात गेले सहा दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापुरातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. यामुळं जिल्ह्यातील ५० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांनाही यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस
रत्नागिरी बरोबरच संगमेश्वरमध्येही जोरदार पाऊस बरसतोय गेल्या 24 तासात संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरच्या शास्त्री नदीचं पात्रही विस्तारलं गेलं आहे. यामुळे पुराचं पाणी संगमेश्वरच्या सखल भागातील बाजारपेठेतही शिरलंय.