मुंबई : एबीपी माझाचे उस्मानाबादचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर 14 एप्रिल रोजी परप्रांतीय कामगार, मजुरांची गर्दी झाल्याचा आरोप करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. वांद्रे स्टेशन परिसरात जमा झालेली गर्दी आणि एबीपी माझावर प्रसारित झालेल्या वृत्ताचा परस्पर संबंध असल्याचे अनेक मेसेज, बातम्या समोर येत आहेत. परंतु हे वृत्त पूर्णत: चुकीचं आणि एबीपी माझाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पसरवलं जात आहे.


रेल्वेच्या वैध पत्राच्या आधारावर आणि माहितीवर एबीपी माझाने हे वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन, रेल्वेने 3 मे 2020 पर्यंत ट्रेन रद्द केल्याचं वृत्त, रिफंडची घोषणा, अशा अनेक बातम्याही दुपारी साडेबारा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत प्रसारित केल्या.


एबीपी माझावर आम्ही दुपारी बाराच्या सुमारास स्पष्ट सांगितलं होतं की, कोणतीही ट्रेन धावणार नाही. त्यामुळे दुपारी पावणेचारच्या सुमारास वांद्रे पश्चिम स्टेशनवर जमा झालेली गर्दी आणि एबीपी माझाच्या वृत्ताचा परस्पर संबंध जोडण्याचा प्रश्न कसा उद्भवू शकतो?


Bandra incident | वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दी प्रकरणावर 'एबीपी माझा'ची भूमिका







एबीपी माझाचं हे वृत्त गुन्हेगारी कृत्य असल्याचं म्हणणं हे अपमानजनक आहे. या वृत्तामुळे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना अटक करणं ही खेदजनक बाब आहे. आम्ही कायदेशीर पावलं नक्कीच उचलू. आम्ही विश्वासाने सांगू शकतो की आम्ही जबाबदार पत्रकारितेच्या मार्गातून भरकटलेलो नाही.




पत्रकारिता आणि मीडिया आवश्यक सेवा आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या 13.4.2020 च्या त्या पत्राचाही इन्कार केला जाऊ शकत नाही, ज्यात स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यांमध्ये पाठवण्यासाठी ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव होता.


Bandra Migrant Crisis | वांद्रे स्टेशन परिसरातील गर्दी पूर्वनियोजित होती?


एबीपी माझा ही जबाबदार आणि प्रतिष्ठित वृत्तवाहिनी आहे. आम्ही कोणतंही वृत्त किंवा माहिती एखाद्या विश्वसनीय सूत्रांकडून घेण्याआधी आणि ती प्रसारित करण्याआधी त्याच्या सत्यतेची हरतऱ्हेने पडताळणी करतो. पंतप्रधानांच्या भाषणाआधी प्रसारित झालेल्या वृत्तानंतर, रेल्वेने 3 मे 2020 पर्यंत कोणतीही ट्रेन धावणार नाही, अशी घोषणा केली. या घोषणेनंतर आम्ही जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून तातडीने ही बातमी प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पत्रकाराला अटक करण्याआधी सर्व तथ्य आणि परिस्थितीचा चौकशी करायला हवी, असं आमचं म्हणणं आहे.


Bandra railway station incident | वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणावर 'एबीपी माझा'ची भूमिका | ABP Majha