वसई : लॉकडाऊनमुळे ताटातूट झालेल्या कुटुंबाची तब्बल 23 दिवसांनी भेट झाली आहे. विरारमध्ये कातकरी पाडा इथे राहणाऱ्या या कुटुंबाची ही कहाणी आहे. तळोजा ते गोरेगाव मग गोरेगाव ते वसई असा सलग पाच दिवस त्यांनी पायी प्रवास केला. वसईला आल्यावर पोलिसांनी त्यांची रिक्षाने विरारने पोहोचण्याची तयारी केली.


घोड दाम्पत्य विरारामधील कातकरी पाडा इथे राहतं. अशोक आणि आरती घोड यांना एकूण सात अपत्य आहेत. त्यांची प्रणय (१४ वर्ष) आणि शिवम (८ वर्ष) ही दोन मुलं शिक्षणासाठी तळोजा इथल्या हॉस्टेलमध्ये राहत होती. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 20 मार्च रोजी आरती घोड मुलांना आणण्यासाठी तळोजाला गेल्या होत्या. परंतु त्यानंतरच्या जनता कर्फ्यूमुळे त्यांना ट्रेनने प्रवास करता आला नाही. शिवाय त्यांच्याकडे मोबाईलही नसल्यामुळे पतीलाही फोन करु शकल्या नाहीत. यातच त्यांची चुकामूक झाली.


अखेर आरती घोड यांनी आपल्या दोन मुलांना घेऊन तळोजा ते गोरेगाव असा पायी प्रवास केला. 13 एप्रिल रोजी कसंतरी करुन त्यांनी आपल्या पतीला संपर्क करुन गोरेगावला बोलावलं. त्यानंतर अशोक घोड विरारवरुन गोरेगावपर्यंत आले. संध्याकाळी सहा वाजता पती-पत्नी आणि मुलांची गोरेगाव स्टेशनजवळ भेट झाली.



वाहनं नव्हती, जाण्यासाठी कोणी मदत करत नव्हते अशावेळी हे कुटुंब सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत गोरेगाव ते विरार असा रेल्वे ट्रॅकवरुन उपाशीपोटी पायी प्रवास करत होते. यावेळी रेल्वे पोलिसांनी वसईला अडविले आणि माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. "ते थकलेले वाटत होते म्हणून त्यांच्याकडे विचारणा केली असता, संपूर्ण घटनाक्रम कुटुंबाने सांगितला. त्यांची कहाणी ऐकून समाधान फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश कुसे यांच्याशी संपर्क साधला. समाधान फाऊंडेशनने त्या भुकेल्या कुटुंबांला जेवणाची व्यवस्था करुन, एक महिन्याचं रेशनही दिलं. कुटुंब विरारमध्ये राहत असल्याने त्यांना रिक्षातून घरी पाठवण्याची सोय केली" असं माणिकपूर पोलीस स्टेशनने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांनी सांगितलं.


मात्र संचारबंदीमधील ही मदत त्या घोड कुटुंबियांसाठी एक अनमोल ठरली आहे.