मुंबई : मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर 2027-2028 सालापर्यंत मुंबईत मराठी माणसाला मुलांसाठी एकही मराठी शाळा उपलब्ध राहणार नाही, अशी भीती भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या आशयाचं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. शिवसेनेने मुंबईत जवळपास 30 वर्षे सत्ता गाजवली, पण मुंबईत मराठीची अवस्था बिकट झाली आहे. मराठी माणूस बाहेर फेकला, तशीच अवस्था मराठी शाळांची आणि भाषेची झाली आहे असा आरोप आमदार साटम यांनी केला आहे.
2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या 413 होती आणि विद्यार्थी संख्या 1,02,214 होती. आता सन 2020-2021 मध्ये शाळांची संख्या फक्त 280 राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त 36,114 इतकी राहिल्याचं साटम यांनी म्हटलं आहे.
अमित साटम यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
मुख्यमंत्री महोदय, आपणास ज्ञात असेल की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 107 हुतात्म्यांनंतर दि. 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईत असलेले हुतात्मा स्मारक आपणास 'मराठी माणसाने' मराठी बाण्यासाठी दिलेल्या बलिदानाची सदैव आठवण करून देत असेलच!
सत्ताधारी सेनेने मराठी आस्मितेचा आधार घेत गेली तीस वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. पण गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशिब?
सन 2010 -2011 मध्ये मराठी शाळांची संख्या 413 होती आणि विद्यार्थी संख्या 1,02,214 होती. आता सन 2020-2021 मध्ये शाळांची संख्या फक्त 280 राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त 36,114. मराठी शाळांना सहा-सहा महिने मुख्यध्यापक मिळत नाही. इतकच नाहीतर 2013 नंतर आवश्यकतेनुसार शिक्षक भरतीही झाली नाही.
आपणास पत्र लिहण्याचे कारण की मला मिळालेल्या माहितीनुसार मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर 2027-2028 सालापर्यंत मराठी माणसाला आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्या मुलांसाठी एकही मराठी शाळा उपलब्ध राहणार नाही.
ज्या मायमराठीने गेली 30 वर्ष मुंबई महानगर पालिकेत एकहाती सत्ता शिवसेनेला दिली, त्याच मराठीचे हाल बघून मला कविवर्य कुसुमाग्रज यांचे वाक्य आठवते. “मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे”.
या आशयाने भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आता मुख्यमंत्री या पत्राला काय उत्तर देतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या :