मुंबई : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वॉक इन सुविधेद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. 18 ते 44 वयोगटातील परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा करण्यात आली असल्याचंही महापालिकेनं जाहीर केलं होतं. त्यानुसार आजपासून ऑन स्पॉट वॉक इन लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु, आज पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रांवर काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. केवळ 50 विद्यार्थ्यांनाच पहिल्या दिवशी लस देण्यात येणार होती, परंतु, 500 विद्यार्थी रांगेत प्रतिक्षेत होते. एबीपी माझाने सकाळी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणातील गोंधळाची बातमी दाखवली होती. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत आता स्लॉटमधील डोसची संख्या वाढवण्यात आली असून 50 ऐवजी 250 विद्यार्थ्यांचं आज लसीकरण केलं जाणार आहे. 


उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या वतीनं लसीकरणासाठीची सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली होती. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या नव्या नियमावलीची माहिती दिली होती. ज्यामध्ये परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिमेत सोप्या पद्धतीनं सहभागी होता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. परंतु, आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळाला. रांगेत 500 विद्यार्थी असून केवळ 50 विद्यार्थ्यांनाच लस देणार असल्याची माहिती लसीकरण केंद्रावर मिळाली. स्लॉट्सबाबत पूर्वसूचना न दिल्यानं विद्यार्थी पालकांना मनस्ताप सहन करावा लागला असून विद्यार्थी आणि पालकांनी एबीपी माझाशी बोलताना संतप्त प्रतिक्रीया दिल्या होत्या. एबीपी माझानं दाखवलेल्या याच वृत्ताची दखल घेत मुंबई महापालिकेनं आपल्या नियमावलीत बदल करत 50 वरुन 250 विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला.


दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम हाती घेतल्यानंतर देशातील जवळपास सर्वच भागांमध्ये लसींचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली. ज्यामुळं लसीकरण मोहिमांमध्ये विभागणी करत प्राधान्यक्रमानुसार लस वितरणास सुरुवात करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेकडून लसीकरणासाठीची सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली होती. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वॉक इन सुविधेद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार आहे. 18 ते 44 वयोगटातील परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा करण्यात आली आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :