मुंबई : पुणे आणि वरळी येथील हिट अँड रन ची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी रस्त्यावर देखील एक हिट अँड रनची घटना घडली आहे. गुरूवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बाईकवरून दूध पोचवण्यासाठी निघालेल्या नवीन वैष्णव या 24 वर्षीय तरुणाला राँग साईडने भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ गाडीने जोराची धडक दिली. या धडकेत दूध वाहतूक करणाऱ्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. कार चालवणारा मुलगा हा अल्पवयीन असून त्याने दारू पिऊन गाडी चालवल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.


तरूणाला धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ पुन्हा रस्त्यावरील खांबावर जाऊन धडकली. त्यामुळे गाडीतील चालकासह 4 जण किरकोळ जखमी झाले. जखमी झालेला कार चालक अल्पवयीन मुलगा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर जोगेश्वरी पूर्वेकडील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार करून पोलीस स्टेशनला आणले. 


वनराई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. अल्पवयीन चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहेत. रक्त तपासणीचा अहवाल आल्यानंतर चालकाने मद्यपान केले होते का याबाबत माहिती मिळू शकते.


गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम येथील बंगल्यामध्ये पहाटेपर्यंत पार्टी करून हे अल्पवयीन तरुण स्कॉर्पिओ गाडीने येत होते. आरे जंगलातील रस्त्यावर राँग साईडने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. 


वनराई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम (BNS) 106 (1), 281, 119, 177 (3a), 181, 184, 134a, 134b अंतर्गत तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार चालक हा 17 वर्षीय मुलगा आहे. त्याच्यासह त्याचे वडील आणि कारमालक इक्बाल उस्मान जीवनी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.


या अपघातावेळी स्कार्पिओ कारमध्ये  चार मुले आणि तीन मुली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस यासंदर्भात रॉयल पाममध्ये पार्टी केलेल्या ठिकाणी व्हिलाच्या सीसीटीव्ही फुटेज घेऊन अधिक तपास करत आहेत. 


ही बातमी वाचा: