मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर जाऊन स्वत: रस्त्याची पाहणी केली. मात्र, यावेळी रस्त्याची खराब अवस्था पाहून त्यांनाही राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळावरुनच संबंधितांना फोन करुन रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्याला तुरुंगात टाका, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार, आता मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गच्या माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील इंदापूर ते बहाने 26.7 कि.मी. अंतरावरील या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदा चेतक इंटरने लिमिटेड आणि अपको इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने संयुक्तपणे 18 डिसेंबर 2017 पासून सुरू केले होते. मात्र, कामात अक्षम्य चूका आणि विहित मुदतीत काम पूर्ण न केल्याने अनेक प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत ठेकेदार कंपनीच्या प्रमुखांवर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुंबई-गोवा महामार्गावरुन (Highway) अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. येथील महामार्गावर सन 2020 पासून आजपावेतो मुंबई गोवा महामार्गावरील संबधित रस्त्यावर नमूद एकूण 170 मोटार अपघात होण्यास व त्यामध्ये एकूण 97 प्रवाशांच्या मृत्यूस आणि एकूण 208 प्रवाशांना लहान/मोठ्या स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती होण्यास त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत झालेले आहेत. म्हणून मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), 501, नमन सेंटर, सी-31, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-51 या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व नमूद प्रकल्पावर काम करणारे नमूद कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांचे तक्रारीवरुन माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजि. क्रमांक 198/2024 भारतीय न्याय संहीता कलम 105,125 (अ) (ब) व 3 (5) अन्वये गुन्हा (Crime News) नोंद करण्यात आलेला आहे. याप्रकरणी प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील अधिक तपास पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बेलदार हे करीत आहेत.
10 टक्क्यांऐवजी 4.61 टक्के या वेगाने काम
महामार्गाच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या 11.80% इतकी बोजारहित जागा शासनाने हस्तांतरीत केली होती. ठेकेदार यांचेकडून सदर काम दोन वर्षांच्या आत पूर्ण करावयाचे होते. मात्र, सदर कामासाठीचा कालावधी संपल्यानंताही मुदत वाव मिळूनही ठेकेदार यांचेकडून सदर सदर मुदत वाढ कालावधीत मासिक 10% या वेगाने काम पुर्ण न होता केवळ 4.61% या वेगाने काम झाले. ठेकेदार यास महामार्ग प्राधिकरणाकडून अनेकवेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. या दरम्यान कंत्राटदार यांच्याकडून करण्यात येत असलेला कामाचा दर्जा तपासून त्याने काम योग्य दर्जा न राखता निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे समोर आले.
कामात सुरक्षा उपाययोजना नाहीत
केंद्र शासनामार्फत याबबाबत वेळोवेळी सदर कामाच्या गुणवत्ता नियंत्रणावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अभियंता ये. ब्लूम एल.एल.सी, यु.एस.ए. शाखा महाड यांच्या मार्फतीने एन.सी.आर.(Non Confirmation Reports)देण्यात आलेले आहेत. तथापी नमूद कंत्राटदार यांच्या कामामध्ये काही सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. काम पूर्ण झालेल्या ठिकाणांपैकी काही ठिकाणी कामाकरिता डायवर्जन घेऊन महामार्गाच्या एकाच लेनवरुन जाणारी व येणारी वाहने वाहन चालकांना धोकादायक स्थितीमध्ये चालविणे भाग पडत होते.ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही त्या ठिकाणी रस्त्याचा भाग उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच, काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेला रस्ता आणि जुना रस्ता यामधील काही भाग खोदून ठेवून ते काम पूर्ण न करता तो तसाच अपूर्ण ठेवून दिलेला आहे. ज्याठिकाणी अशाप्रकारे काम अपूर्ण ठेवलेले आहे, त्या ठिकाणी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणताही धोका निर्माण होऊ नये याकरिता कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केलेल्या नाहीत. परिणामी नमूद महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना रस्त्याच्या अशा धोकादायक परिस्थितीची कोणतीही जाणीव अंदाज येत नसल्या कारणाने अर्धवट काम सोडून धोकादायक स्थितीमध्ये ठेवून दिलेल्या महामार्गावर वारंवार मोटार अपघात होवून अशा मोटार अपघातांमध्ये अनेक प्रवाशांची जिवीतहानी झालेली आहे.
प्रवाशांचा जीव धोक्यात
ही बाब गंभीर असल्याने मे.चेलका एंटरप्रायझेस लिमीटेड (थे. चेतक अपको (को) ट्रेक्टर), 509, नमन सेंटर, सी-39. जी बकबा कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-59 यांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कि.मी. नंबर 84 ते कि.मी.नंबर 108 या विकाणच्या इंदापूर ते बहपाले, जि. रायगड या भागातील महामार्गाच्या रुंदकरण आधुनिकीकरणाचे काम सुरु केले. परंतु, त्यांनी सदरचे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहिन काम केले व दर्जाहिन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास पडलेल्या खड्डड्यांमुळे, तसेच काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती/सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. तथापी त्यांनी ह्या उपाययोजना न केल्यामुळे नमूद महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या अशा धोकादायक परिस्थितीची कोणतीही जाणीव व अंदाज न येता अपघात होऊन त्यामध्ये प्रवाशांची जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा 'धोक्यात येऊ शकते, याची पुर्णपणे जाणीव असतांना देखील त्यांनी निष्काळजीपणा दाखवून वरीलप्रमाणे कामामध्ये पुर्तता केली नसल्याचे उघडकीस आले आहे.