मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या सोम्या गोम्याच्या टीकेला संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलंय.  सोम्या गोम्या कोण हे 2024 ला कळेल असं राऊतांनी म्हटलंय. आक्रोश मोर्चाच्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांची नक्कल केली होती. त्यावर बोलताना अजित पवारांनी संजय राऊतांचा उल्लेख सोम्या गोम्या असा केला. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) सहभागी होण्यावरून सध्या चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय असल्याची प्रतिक्रिया  संजय राऊत यांनी दिलीय. 


संजय राऊत म्हणाले, त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत.  ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलू नये आणि यापेक्षा बोलण्याची मला गरज नाही. सोम्या गोम्या कोण आहेत 2024 ला कळेल.  या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना महाराष्ट्रातले उद्योग पळवले रोजगार पळवले जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकारमधले हौसे गौसे नवशे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत.  त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही.  इतकं नामर्द सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात झालेले नाही.  डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय तर फक्त आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटत आहेत.


महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे : संजय राऊत


 प्रकाश आंबेडकर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगला समन्वय आहे, प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे. आंबेडकर आणि शरद पवार यांचा ही संवाद आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडी हा पुढला विषय आहे आम्ही महाराष्ट्राचा विचार करत आहोत. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. ही शरद पवारांची,  उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भूमिका आहे.  त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे, असे राऊत म्हणाले. 


इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी आपल्याला समोर आणावा लागेल : संजय राऊत


इंडिया आघाडी नितीश कुमार संयोजक होण्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणाले, अद्याप इंडिया आघाडीची नवीन बैठक झालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. दिल्लीतल्या इंडिया बैठकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक चेहरा आपल्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी आपल्याला समोर आणावा लागेल, मग एक ज्येष्ठ नेता समन्वयक तो आणावा असा एकमताने निर्णय घेण्यात येईल .


2024 ला कळेल नक्की कोण कुठे आहे : संजय राऊत


जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत म्हणाले, जयंत पाटील कालच मातोश्रीवर होते. अशा प्रकारच्या बातम्या व अफवा पसरवून काही उपयोग नाही, ज्यांना जायचं होतं ते डरपोक लोक होते बेईमान लोक होते जे निघून गेले. जे आता थांबले आहेत एकनिष्ठेने मग ते शिवसेनेमध्ये असतील किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असतील त्यांना विविध आमिष दाखवली जात आहेत. त्यांच्यावर दबाव टाकले जात आहेत पण आता जे आहेत ते अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवून काही गोंधळ वगैरे होणार नाही.  2024 विधानसभा लोकसभा आम्ही सर्व एकत्रित लढवत आहोत आणि 2024 ला कळेल नक्की कोण कुठे आहे.