Aaditya Thackeray : सतीश सालियन यांच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे उत्तर, बदनामीचा कोणताही हेतू नसल्याचा दावा
Disha Salian Case : सतीश सालियन यांनी केलेले सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले असून ते तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी नोटिशीला उत्तर दिले आहे.
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सतीश सालियन यांच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी सतीश सालियन यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. 16 सप्टेंबरला केलेल्या पोस्टमध्ये सतीश सालियन यांचं नाव कुठेही नव्हतं असं आदित्य ठाकरेंनी दिलेल्या उत्तरात नमूद करण्यात आलं आहे. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आल्याचंही आदित्य ठाकरे यांनी या उत्तरात म्हटलं आहे.
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सतीश सालियन सीबीआयला (CBI) पेनड्राईव्ह देणार असल्याची माहिती आहे. दिशा सालियन प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीहून CBI अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यावर आदित्य ठाकरे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करत आपल्यावरील आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगितलं. तसेच दिशा सालियन हिला आपण ओळखत नाही, तिच्याशी कधीही भेट झाली नसल्याचा दावाही केला. त्यानंतर दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस दिली होती.
आदित्य ठाकरे यांचे उत्तर
आदित्य ठाकरे यांच्या वकिलांकडून सतीश सालियन यांच्या कायदेशीर नोटिसीला उत्तर देण्यात आलं आहे. सतीश सालियन यांनी केलेले सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले असून ते तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. 16 सप्टेंबरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचं नाव कुठेही घेतलेलं नाही, असा दावा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. पोस्टमधील कोणतंही विशिष्ट वाक्य सतीश सालियन यांच्याकडे निर्देश करत नसल्याचं उत्तरात नमूद करण्यात आलं आहे.
राजकीय आणि माध्यमांच्या मोहिमेमुळे सतीश सालियन यांचं नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणातील आरोपांवर अधिकृत तपास होण्याची गरज असून आदित्य ठाकरेंनी त्याची निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. सतीश सालियन यांच्याविरोधात बदनामीचा कोणताही हेतू नसल्याचं आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे.
सतीश सालियन CBI ला देणार पेनड्राईव्ह
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी दिल्लीहून मुंबईला दाखल झाले आहेत. सतीश सालियन हे सीबीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असून त्यांना एक पेनड्राईव्ह देणार असल्याची माहिती आहे.
या पेनड्राईव्हमध्ये प्रत्यक्षदर्शीचा व्हिडीओ जबाब असल्याचा दावा सतीश सालियन यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती आहे. या जबाबात आदित्य ठाकरे आणि इतर व्यक्तींचा घटनास्थळी सहभाग असल्याचा दावाही करण्यात आल्याची माहिती आहे.
इतर प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाची माहिती असलेल्या व्यक्तींची माहितीही या पेनड्राईव्हच्या माध्यमातून सतीश सालियन CBI ला देणार आहेत. तसेच परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवून त्यांच्या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी देखील करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..





















