मुंबई : नाशिकमधून निघालेला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा मजल-दरमजल करत मुंबईत दाखल झाला. ठाण्यात शनिवारी रात्री घेतलेल्या मुक्कामानंतर हा मोर्चा उद्या, म्हणजे सोमवार 12 मार्चला विधीमंडळावर धडकणार आहे. यावेळी किसान सभेच्या मोर्चेकऱ्यांची आझाद मैदानावर भव्य सभा होईल.


किसान सभेचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते उद्याच्या सभेत सहभागी होणार आहेत. उद्या संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सिस्ट) नेते खासदार सीताराम येचुरी आणि ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम सभेला संबोधित करणार आहेत.

गेल्या महिन्यात आमरा राम यांनी राजस्थानमधल्या मोठ्या किसान आंदोलनाचं नेतृत्व करत राजस्थान ठप्प केलं होतं. त्यानंतर ते आता राज्याची राजधानी मुंबईत शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन सरकार मोर्चेकऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं.