मुंबई : नाशिकमधून निघालेला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा मजल-दरमजल करत मुंबईत दाखल झाला. ठाण्यात शनिवारी रात्री घेतलेल्या मुक्कामानंतर हा मोर्चा उद्या, म्हणजे सोमवार 12 मार्चला विधीमंडळावर धडकणार आहे. मात्र वाहतुकीतील बदलांमुळे दहावीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते.


विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचावं यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घरातून लवकर निघण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशीही माहिती विनोद तावडे यांनी दिली.

विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय.