मुंबई : मुंबईत आज दोन मोठ्या दुर्घटना वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने टळल्या. चर्चगेट वरून बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाडीच्या पेंटाग्राफमध्ये खार रोड  स्टेशनवर आग लागली तर वसईहून भिवंडीकडे जाणाऱ्या मालगाडीवरील ट्रकला आग लागल्याने बराच वेळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

चर्चगेट वरून बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या गाडीच्या पेंटाग्राफमध्ये खार रोड  स्टेशनवर आग लागली. आगीचे लोळ डब्यावर आल्याने प्रवाश्यांना तात्काळ खाली उतरवले. बोरीवलीला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये हा प्रकार घडला. यामुळे बोरीवलीच्या दिशेला जाणाऱ्या जलद लोकलची वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. एफओबीवरून ओव्हरहेड वायर वर कुणीतरी कपडा टाकल्याने ही आग लागली. सध्या ओव्हरहेड वायरचा पुरवठा बंद केला असून त्यामुळे लोकल रखडल्या आहेत.

दुसरीकडे भिवंडी-वसई रेल्वे मार्गावर डुंगे -वडघर गावाजवळ वसईहून भिवंडीकडे जाणाऱ्या मालगाडीवर ट्रकची वाहतूक होत असताना अचानक मालगाडीवरील ट्रकला आग लागली. या ट्रकमध्ये विविध प्रकारचे सामान होते. ही मालगाडी वापीहून मैंगलोरला जात होती. ओव्हरहेड वायरचा ट्रकला स्पर्श झाल्यामुळे ट्रकला आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे वसई ते भिवंडी रेल्वेमार्ग वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. एका तासानंतर ही आग आटोक्यात आणली गेली.