मुंबई : भारतीय गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबई आणि गुजरातमधून जवळपास आठ हजार किलो शार्क माशांचे कल्ले जप्त केले आहेत. या कारवाईने तस्करीची मोठी साखळी उध्वस्त केलं असल्याचं गुप्तवार्ता संचालनालयाने म्हटलं आहे.
मुंबईतल्या शिवडीमधील गोदामातून तीन हजार किलो, तर गुजरातमधील वेरावलमधून पाच हजार किलो शार्क माशाचे कल्ले हस्तगत करण्यात आले. कारवाईत एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आलंय. गुप्तवार्ता संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार आठ हजार किलो कल्ले चीन आणि हाँगकाँगला निर्यात करण्यात येत होते.
निरीक्षकांच्या पाहणीनंतर हे शार्क माशाचे कल्ले असल्याचे स्पष्ट केले. परराष्ट्र व्यापार संचालनालयाने शार्क माशांच्या कल्ल्यांच्या बंदी आणलेली आहे.
कशी केली जाते शार्क माश्यांच्या कल्ल्यांची तस्करी
तस्करी करणाऱ्या टोळीमार्फत प्रथमत: शार्क माशाला पकडण्यात येतं. त्यानंतर त्यांचे कल्ले कापले जातात. शार्क माश्याचे कल्ले कापल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडलं जातं.
मात्र कल्ल्यांचा उपयोग करतच शार्क मासे पाण्यात पोहतात. कल्ले नसल्यामुळे शार्क मासे पोहू शकत नाहीत त्यामुळे ते बुडत समुद्राच्या तळाशी जातात आणि मृत्यूमुखी पडतात.
कशासाठी होतो शार्क माशांच्या कल्ल्यांचा वापर?
शार्क माशाच्या कल्ल्यांचा वापर सूप तयार होतो. चीन आणि व्हिएतनाममध्ये ‘शार्क फिन सूप’ला मोठी मागणी आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये मोठ मोठ्या कार्यक्रमांमधील जेवणामध्ये या सूपचा वापर होतो.