ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आयोजित ‘प्रो-गोविंदा’ दहीहंडी स्पर्धेत वडाळ्याच्या अष्टविनायक मंडळाने बाजी मारत, प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या 59 सेकंदात अष्टविनायक मंडळाने आठ थरांचा मानवी मनोरा रचला.


ठाणे शहरातील वर्तक नगरमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नवीन संकल्पना आणत, ‘प्रो-गोविंदा’ दहीहंडी आयोजित केली होती. दहीहंडीचा साहसी खेळात समाविष्ट झाल्याने, आमदार सरनाईक यांनी ‘प्रो-गोविंदा’ अशी स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेत 15 दहीहंडी पथकांनी सहभाग घेतला होता.

प्रो-गोविंदाचे विजेते

क्रमांक 1 - अष्टविनायक मंडळ, वडाळा, मुंबई


थर – 8

वेळ – 59 सेकंद

क्रमांक 2 - बालवीर गोविंदा पथक

थर – 8

वेळ – 1.08 मिनिट

क्रमांक 3 - कोकण नगर

थर – 8

वेळ – 1.03 मिनिट

क्रमांक 4 - शिवसाई गोविंदा पथक, बोरिवली, मुंबई


वेळ – 1.17 मिनिट

मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा उत्साह

मुंबईत आज गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. रात्र झाली मात्र अजूनही गोविंदांचा उत्साह काही कमी झालेला नाही. ठाणे, घाटकोपर, बोरिवलीत गोविंदा पथकाचा थरार अजूनही सुरुच आहे.

ठाण्यातल्या नौपाडामध्ये मनसेच्या वतीने दहीहंडी साजरी करण्यात आली. यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. या हंडीला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी आव्हाडांनीही थरावर चढत ठेका धरला.

तर घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्यातर्फेही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या हंडीला खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार किरीट सोमय्या, शिवाय अभिनेते भाऊ कदम यांनी उपस्थिती लावली. भाऊ कदम आणि किरीट सोमय्या यांच्या नृत्यानं तर सोहळ्याला रंगत चढली. तर तिकडे बोरीवलीत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेल्या दहीहंडीला गोविंदा पथकांनी थर रचून सलामी दिली. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक मराठी कलाकार आणि अभिनेत्रींनी ठेका धरला.