मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नौपाड्यात दहीहंडी आयोजित केली होती. या दहीहंडीला अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावली. गोविंदांचा उत्साह, जल्लोष आणि थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. हा थरार स्वत: जितेंद्र आव्हाड यापूर्वी आयोजक म्हणून अनुभवत होते. मंचावर जाऊन विविध पण खास वेशभूषेत ते पाहायला मिळत.
मात्र गेल्या काही वर्षांपासून आव्हाडांनी दहीहंडी उत्सव न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते दहीकाल्यापासून लांब होते. पण काल आव्हाड स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनी मनसेच्या दहीहंडीत हजेरी लावून थरार अनुभवला.
आव्हाड म्हणाले, “मी मनसे, शिवसेना मानत नाही. दहीहंडी सर्वांची असते. हंडीवर चढणाऱ्याची जात-धर्म-पंथ काही माहित नसते. इथे सर्व गोविंदा असतात, एक गोविंदा वर जातो, त्याला सर्वजण मदत करतात. एवढ्या गर्दीत कोण कोणाचा काहीच कळत नसतं. सर्वजण एक असतात. दहीहंडीचा थरार मी मिस करतोय”.