मुंबई : मुंबईमध्ये प्रत्येक 8 जणांपैकी एका व्यक्तीला कॅन्सर आहे, असा धक्कादायक अहवाल इंडियन कॅन्सर सोसायटीने दिला आहे. 2014 मध्ये 13 हजार 564 कॅन्सरग्रस्त आढळून आले आहेत. मुंबईतील 137 रुग्णालयातून ही माहिती जमा करण्यात आली, असं इंडियन कॅन्सर सोसायटीने पत्रकार परिषदेत सांगितलं.


कॅन्सरग्रस्तांचं प्रमाण 2010 ते 2014 या काळात 12 टक्क्यांनी वाढलं असून हे प्रमाण प्रत्येक 8 व्यक्तींमागे एक असं असल्याचं आढळून आलं आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 50 टक्के व्यक्ती कॅन्सरग्रस्त असल्याचं आढळून आलं, तर 40 टक्के कॅन्सर हा 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून आला, अशी माहिती इंडियन कॅन्सर सोसायटीचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय देशमाने यांनी दिली.

कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागे कोणताही एक घटक कारणीभूत नसून अनेक कारणांमुळे कॅन्सर होत असल्याचं आढळून आलं आहे. मात्र सतत बदलणारं वातावरण आणि वाढतं वय हे कॅन्सरमागचं मुख्य कारण असल्याचं देशमाने यांनी सांगितलं.

कोणत्या कॅन्सरचं प्रमाण अधिक?

2014 मध्ये आढळून आलेल्या 13 हजार 564 रुग्णांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर फुफ्फुसाचा कॅन्सर 7.8 टक्के, तोंडाचा कॅन्सर 6.2 टक्के, यकृताचा कॅन्सर 4.5 टक्के आणि प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण 3.8 टक्के एवढं आहे.

कॅन्सरचं प्रमाण पुरुष आणि महिलांमध्ये समान

पुरुष आणि महिलांना कॅन्सर होण्याचं प्रमाण जवळपास सारखच असल्याचं इंडियन कॅन्सर सोसायटीच्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालात 49 टक्के पुरुष, तर 51 टक्के महिलांना कॅन्सर असल्याचं आढळून आलं. लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण 1.5 टक्के एवढं आहे. तंबाखू, गुटख्यामुळे 40 टक्के पुरुषांना, तर 16 टक्के महिलांना कॅन्सर झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.

महिलांमध्ये गर्भाशय आणि ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलं असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 9 टक्के, गर्भाशय कॅन्सर 8 टक्के, फुफ्फुसाचा कॅन्सर 3 टक्के आढळून आला आहे.

पुरुषांमध्ये तोंडाचा, फुफ्फुसाचा आणि यकृताचा कॅन्सर वाढत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 10.4 टक्के पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर आढळून आला, ज्याचं प्रमाण महिलांमध्येही अधिक आहे. तोंडाचा कॅन्सर 9.6 टक्के, प्रोस्टेट कॅन्सर 7.8 टक्के, यकृताचा कॅन्सर 6.3 टक्के आणि लिम्फोमा कॅन्सरचं प्रमाण 5.2 टक्के असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी उपाय काय?

सततचं बदलतं वातावरण हे कॅन्सरचं एक कारण असल्याचं डॉ. देशमाने यांनी सांगितलं. त्यामुळे नेहमी निरोगी राहिल्यास कॅन्सरचा धोका संभवत नाही. सोबतच व्यायाम, लवकरात लवकर आजाराचं निदान आणि संतुलित आहार हे कॅन्सरपासून दूर राहण्याचे चांगले उपाय आहेत, असं डॉ. देशमाने यांनी सांगितलं.