छोटा भाऊ युतीसाठी तयार, अजूनही वेळ गेलेली नाही : नांदगावकर
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2017 07:09 PM (IST)
NEXT PREV
मुंबई : छोटा भाऊ म्हणून मनसे युतीसाठी तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने युतीच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशा भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्या आहेत. मुंबईच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी आपली इच्छा असल्याचंही नांदगावकरांनी सांगितलं. विनाशर्त युतीचा प्रस्ताव मराठी माणसांसाठी दोन भावांनी एकत्र यावं, अशी आपली इच्छा असल्याची भावना बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली. मुंबईचं भलं व्हावं यासाठी आपण करत असलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनसेकडून युतीसाठी कुठलीही अट नव्हती. आम्हाला या ठिकाणी मदत करा, या जागा सोडा, अशी कुठलीही मागणी नव्हती. लहान भाऊ म्हणून ज्या जागा द्याल, त्या मान्य असतील, असा प्रस्ताव दिल्याचं नांदगावकर म्हणाले. मुंबईच्या हितासाठी एकत्र यावं मुंबईच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावं, अशी आपली इच्छा आहे. राष्ट्रीय पक्षांना राज्याच्या अस्मितेबाबत काहीही पडलेलं नसतं. मात्र मराठी माणसांनी, हक्काच्या माणसांनी एकत्र यावं, अशी आपली भावना असल्याचं नांदगावकरांनी स्पष्ट केलं. मला कोणतीही प्रसिद्धी नको होती, हे कुटुंबातलं प्रकरण होतं, प्रसारमाध्यमांना सांगायचंच असतं, तर ढोल बडवत गेलो असतो, असंही नांदगावकर म्हणाले. युतीचा फायदा शिवसेनेलाच युती झाली असती तर शिवसेनेलाच फायदा झाला असता, असं आपलं ठाम मत असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. राज यांनी सात वेळा फोन केले, तीन वेळा तर माझ्या समोरच केले. राज ठाकरेंची भावना मला समजली, त्यामुळे मी युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेना विचार करु शकते, असं आवाहनही नांदगावकरांनी केलं. आमची तयारी पूर्ण आमची तयारी पूर्ण आहे, एबी फॉर्म, उमेदवार यादीचं काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्याप्रमाणे सामान्य नागरिकांचीही भावना आहे, याच प्रांजळ भावनेने मी गेलो होतो, असं नांदगावकरांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे मातोश्रीवर गेले असते राज ठाकरे स्वतः फोन करत होते, म्हणजे वेळ पडल्यास राजसाहेब मातोश्रीवर गेले असते, अशी खात्री बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली. मनसेची परिस्थिती आणखी काय वाईट होणार, अशी कळकळ व्यक्त करतानाच मुंबईच्या हितासाठी दोन पावलं मागे जाण्यास मनसे तयार असल्याचंही नांदगावकरांनी स्पष्ट केलं. तर मीच खोटं बोलत असेन... लहान भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार आहे. आमच्या प्रस्तावाचा सन्मान राखा, त्याबाबत विचार करा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडे केल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे जर कोणताच प्रस्ताव आला नसल्याचं सांगत असतील, तर मीच खोटं बोलत असेन, असं नांदगावकर म्हणाले. रविवारी संध्याकाळी मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे आपण युतीचा प्रस्ताव ठेवला. आपला निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवण्याचं आश्वासन सर्व नेत्यांनी दिलं. मिलिंद नार्वेकरांनी आपल्याला सन्मानाने आत आणलं आणि जाताना बाहेरपर्यंतही सोडलं, मात्र उद्धव ठाकरे जर कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचं म्हणत असतील, तर कदाचित मीच खोटं बोलत असेन, असं नांदगावकर हतबलपणे म्हणाले.