पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. मनसेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या भाजप प्रवेशासाठी खासदार संजय काकडे आग्रही होते. मात्र धंगेकरांना भाजपमध्ये प्रवेश दिला तर राजीनामा देऊ अशी आक्रमक भूमिका गिरीश बापट यांनी घेतली.
पुण्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत जोरदार गटबाजी झाल्याची चर्चा आहे. शिवाजी नगर, कॅन्टॉनमेंट बोर्ड, वडगावशेरीमधील उमेदवार आपल्या पसंतीचे द्यावेत यासाठी संजय काकडे अडून बसले आहेत.
पुण्यात तिकिट वाटपावरुन भाजप नेत्यांमध्ये हमरीतुमरी
आपल्या समर्थकांना तिकीट मिळावं म्हणून भाजप नेते हमरीतुमरीवर उतरले. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत यावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं जातं.
शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजप नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावली आहे. पुण्यात तिकिटवाटपासंबंधी भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला खा. अनिल शिरोळे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, अंकुश काकडे आदी नेते हजर होते. मात्र तिकिटवाटपावरुन या नेत्यांमध्ये वादावादी झाली.
धंगेकरांमुळे काँग्रेसला ताकद : चव्हाण
धंगेकर विधानसभा निवडणुकीत गिरीश बापटांच्या विरोधात उभे राहिले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. दरम्यान, मागच्या वेळेस सर्वाधिक मतं घेतलेल्या धंगेकरांच्या प्रवेशाने पक्षाला अधिक ताकद मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.