मुंबई : एकीकडे दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिल मे 2021 मध्ये होणार असून त्या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत सांगितले. मात्र, त्याच दरम्यान राज्यातील ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणात 61 टक्के विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीने व्हावी, असं मत मांडलं आहे. तर ऑनलाईन शिकताना अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने 33 टक्के विद्यार्थ्यांनी यंदाची एप्रिल मे मधील बोर्ड परीक्षाच न देण्याचा निर्णय या सर्वेक्षणात मांडला आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षा घेणाऱ्या राज्य मंडळाला त्यासोबत राज्यातील बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि त्यांचे शिक्षक यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा अनेक प्रश्न आणि त्याबाबतच मत सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
यू-ट्यूबवरुन मोफत शिक्षण देणाऱ्या विविध अनुदानित; तसेच विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी एकत्र येऊन दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेबाबत मत जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले. यात विद्यार्थी आणि पालक यांना नेमके काय वाटते, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने सांताक्रूझ येथील शाळेतील गणित शिक्षक दिनेशकुमार गुप्ता यांनी सर्वेक्षण करण्याचे ठरवले. गुप्ता यांच्यासह अनेक शिक्षक यू-ट्यूबवर गेल्या अनेक वर्षांपासून मोफत विद्यादानाचे काम करत आहेत. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी गुप्ता यांनी या सर्व शिक्षकांना एकत्र आणून राज्यातील 36 जिल्ह्यांपर्यंत पोहोचून हे सर्वेक्षण पूर्ण केले.
या सर्वेक्षणात 1 लाख 58 हजार विद्यार्थी पालकांचा सध्याच्या कोरोना परिस्थितीचा विचार करता मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये बोर्ड परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी यासाठी 61 टक्के विद्यार्थी पालकांनी संमती दर्शवलीये तर 19 टक्के ऑफलाइन परिक्षेची मागणी करत आहे. तर 21 टक्के कोणत्याही पद्धतीने परीक्षा देण्यास तयार आहेत. या सर्वेक्षणमध्ये ऑनलाईन परीक्षेला एकीकडे पसंती दर्शवली आहे. तरीसुध्दा, अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने 33 टक्के विद्यार्थी बोर्ड परीक्षा न देण्याचा विचार करता आहेत.
या सर्वेक्षणातून समोर आलेले महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया-
1. बोर्ड परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जावी?
- 61% विद्यार्थ्यांच्या मते ऑनलाईन घेण्यात यावी
- 19% विद्यार्थ्यांच्या मते ऑफलाईन घेण्यात यावी
- 21% विद्यार्थी कोणत्याही पद्धतीने परीक्षा द्यायला तयार
2. सद्यस्थितीत अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने किंवा परीक्षेची तयारी नसल्याने चांगल्या मार्कासाठी यावर्षी ड्रॉप घेण्याचा विचार आहे का?
- 33% विद्यार्थी ड्रॉप घेण्याच्या विचारात
- 44% विद्यार्थी ड्रॉप घेणार नाहीत
- 23% विद्यार्थी अजून संभ्रमात
3. 79 टक्के विद्यार्थी, पालक एप्रिल-मेमध्ये परीक्षा घेण्याच्या निर्णयावर समाधानी नाहीत
4. 79 टक्के विद्यार्थी पालकांच्या मते सद्यस्थिती पाहता बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करणे आवश्यक आहे
5. 84 टक्के विद्यार्थ्यांचा म्हणणे आहे की परिक्षेसाठी अभ्यासक्रम आणखी कमी करण्यात यावा
6. तर 69 टक्के विद्यार्थी वर्षभरात झालेल्या ऑनलाईन शिक्षणावर समाधानी नसल्याचे समोर आलं आहे.
हे सर्वेक्षण जरी एकीकडे केले जात असले आणि विविध मागण्या बोर्ड परीक्षेबाबत समोर येत असल्या तरी शिक्षण विभागाने मात्र परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकनुसार ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय, पेपर पॅटर्न, अभ्यासक्रम सगळं आधीच ठरलेले असताना अचानक यामध्ये बदल करणे शक्य नसून त्यासाठी पुढे परिस्थिती पाहून शिक्षण तज्ज्ञांचा विचार घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाचा शिक्षण विभाग किती गांभीर्याने विचार करते, हे पाहावं लागेल.