मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहविभागाकडून हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "याचा तपास एटीएसकडे दिलेला आहे. या व्यतिरिक्त तपास एनआयकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काळंबेरं आहे." माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच हा विरोधी पक्ष महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.


उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासास्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली. त्यातच या कारचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत आढळला होता. यानंतर या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एनआयएकडे तपास देण्याची मागणी केली होती.


त्यानंतर केंद्रीय गृहविभागाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "यापूर्वीच हा तपास गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. आमचा आमच्या यंत्रणांवर विश्वास आहे. या व्यतिरिक्त हा या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा विचार असेल तर नक्कीच यात काही काळंबेरं आहे. आम्ही सुद्धा तपासातून ते उघड करणार आहोत."


खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार : मुख्यमंत्री
दादरा नगर हवेलीमधील सिल्वासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येविषयी बोलायला विरोधी पक्षनेते तयार नाहीत. केंद्रशासित प्रदेश कोणाच्या अखत्यारित येतो हे सगळ्यांना माहित आहे. तिथून सात वेळा निवडून आलेल्या खासदाराने मुंबईत आत्महत्या करावी हे तिथल्या प्रशासनासाठी लांछनास्पद आहे. त्या आत्महत्येच्या सुसाईड नोट सापडली. ज्यांचा उल्लेख असेल त्यांची चौकशी केली जाईल आणि कितीही मोठा असला तरी शिक्षा दिल्याशिवाय महाराष्ट्र सरकार गप्प बसणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


'विरोधी पक्ष महाराष्ट्राला बदनाम करतोय'
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम विरोधी पक्ष करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, "सरकारे आएगी जाएगी मगर ये देश रहना चाहिए," असं अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे. यंत्रणा बदनाम होता कामा नये. सध्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा काम महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करत आहे. जणू काही महाराष्ट्रात कोणतीही यंत्रणा नाही आणि सगळं केंद्राच्या अखत्यारित आहे, असं त्याचं मत आहे. जर सगळंच केंद्राच्या अखत्यारित आहे तर इंधनदरवाढीचा निर्णयही त्यांच्या पदरात टाका ना."


'मागच्या कार्यकाळातील मुख्यमंत्र्यांचा सध्याच्या सरकारवर विश्वास नाही'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरु आहे. सिल्वासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांचा उल्लेख असेल तर त्यांना शिक्षा होईलच. दुर्दैवाने मागच्या कार्यकाळात मुख्यमंत्री होते, त्यांचा सध्याच्या सरकारवर विश्वास नाही. पण इथलं सरकार योग्य ती चौकशी करुन त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा करेल, असा विश्वास व्यक्त सिल्वासाच्या खासदाराने केला होता. त्यांच्या कुटुंबीयांनीही न्यायाची अपेक्षा राज्य सरकारकडे व्यक्त केला आहे."


आमचे पोलीस योग्य तपास करत आहेत : अनिल देशमुख
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास एनआयएकडे देण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने घेतला होता काय झालं? आत्महत्या का हत्या याचा तपास अजून लागलेला नाही, पण यात दिंरगाई होऊ नये अशी आशा आहे. आमचे पोलीस योग्य तपास करत आहेत. मनसुख हिरेनची केस एटीएस हाताळत आहेत. त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला गेला आहे.