मुंबई : दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांची आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बातचित करत आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरमध्ये बोर्डाने पेपर पॅटर्न ठरतो त्याची तपासणी कशी करायचं हे ठरतं. गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. आठवी नववी परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
बोर्डाच्या परीक्षेबाबत सूचना, मागण्या काही लोकांनी दिल्या आहेत. मात्र पेपर पॅटर्न आणि त्यानुसार मार्क्स असतात व पेपर त्यानुसार तयार केलेले असतात. त्यात काही गोष्टीची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमसाठी विद्यार्थ्यांचा यावर्षीचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अजूनही सुरू राहू द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळा बंद आहेत, त्यामुळे विद्यार्था ऑनलाईन शिकत आहेत. विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं हा आमचा प्रयत्न आहे. परीक्षेसंदर्भात लवकरच सांगू, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
दहावी, बारावी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर
बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलं होतं. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. त्यानुसार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार आहे.