मुंबई : खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल तसंच सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांच हित जोपासलं जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी मंत्रालयात आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी विशेष आमंत्रित काही कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्य मंत्री दीपक केसरकर ही उपस्थित होते.
शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार
शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गावोगावी आणि दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा दिल्या जातील. तसंच कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिलं जाईल असं ते म्हणाले.
कोविड योद्धे खरे स्वातंत्र्य योद्धे
कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स,नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत,आपल्यासाठी स्वातंत्र्य योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पोलीस /जवानांची कामगिरी
कोरोनाच्या कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले काम चोखपणे बजावले. पण हे करताना काही पोलिस अधिकारी व कर्मचारी ही कोरोनाला बळी पडले. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना देखील त्यांनी अभिवादन केले.
मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला शाळा सुरू करता नाही आल्या. पण आपण राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील याची काळजी घेतली. ऑनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात आज घडीला अंदाजे 60 हजार उद्योग सुरू झाले आहेत. 16 लाखांहून अधिक कामगार आणि कर्मचारी वर्ग कामावर परतला आहे. स्थानिकांना मराठी माणसाला रोजगार मिळावा म्हणून शासनाने 'महा जॉब्ज' पोर्टल सुरू केले. मोबाईल ॲपही सुरू झाले आहे. सर्वसामान्यांना घरे मिळावीत यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू करणार.
आरोग्यविषयक महत्त्वाचे निर्णय
देशात प्रथमच असा तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टरांचे सुद्धा टास्क फोर्स तयार केले .गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या तयार करून गावकरी आणि लोकांवरही जबाबदारी टाकण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. साडेचार कोटी लिटर दुधाचे रूपांतर भुकटीत केले. आदिवासी मुले व महिलांना ही दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे 418 लाख क्विंटल कापूस खरेदी शासनाने या वर्षी केली, असं मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या
PM Narendra Modi | कुठवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल फेकत राहणार, आत्मनिर्भर व्हावंच लागेल : पंतप्रधान मोदी
कोरोनावरील भारतातील लसींची प्रगती काय? पंतप्रधान मोदी म्हणाले...
खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा, शेतकरी-कामगारांचं हित जोपासणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2020 11:38 AM (IST)
खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल तसंच सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांच हित जोपासलं जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी मंत्रालयात आपलं मनोगत व्यक्त केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -