मुंबई : मुंबईत महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच आता मुंबई महापालिकाही महिलांसाठी सुरक्षित नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मुंबई महानगरपालिकेत वर्षाला लैंगिक अत्याचाराच्या 29 तक्रारी येत असल्याचं समोर आलं आहे.

 

महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राकडून अनिल गलगली यांनी ही माहिती मिळवली आहे.

 

2013 ते 2016 या 4 वर्षात एकूण 118 लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी आल्या असून 2016 मध्ये  21 पैकी 4 प्रकरणं प्रलंबित आहे. मागील 4 वर्षात निकाली काढलेल्या  प्रकरणाची संख्या 96 टक्के आहे. पण ज्या तक्रारीत तथ्य आढळलं, त्यावर झालेल्या कारवाईची माहिती दिली नसल्याचं अनिल गलगली यांनी सांगितलं.

 

लैंगिक अत्याचाराप्रकरणी दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवरील कारवाईची माहिती सार्वजनिक करुन पालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित करावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. लाजेखातर लोक अशी कृत्य करणार नाहीत आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनेत घट होईल, असा विश्वास गलगली यांनी व्यक्त केला आहे.