मुंबई : कोरोनासोबतच यंदा पावसाळ्यात पूरस्थितीशी लढा द्यावा लागणार आहे. यंदा पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तब्बल 20 दिवस समुद्राला उधाण येणार असल्याची माहिती पंचागकर्त, खगोल अभ्यासक दा. कृ.सोमण यांनी दिली आहे. तेव्हा महिनाभरावर येऊन ठेपलेल्या पावसात उधाणाच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्यास मुंबई, ठाणे परिसर जलमय होऊन मोठया नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मागील दीड महिन्यापासून कोरोनाशी युद्ध सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात उपलब्ध मनुष्यबळाच्या साथीने सर्वच यंत्रणा कार्यरत आहेत. एकीकडे कोरोनाशी दोन हात करीत असतानाच मे उजाडल्याने जून-जुलै-ऑगस्टमधील पावसाळ्याचे वेध सुरू झाले आहेत. पावसाळ्यात समुद्राच्या उधाण भरतीच्यावेळी जर जोराचा पाऊस झाला तर मुंबई, ठाणेसारख्या शहरामध्ये पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. समुद्राला जून-जुलै-ऑगस्ट महिन्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त भरती येणार असलेले दिवस, वेळ व समुद्राच्या पाण्याची उंची खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली आहे. यंदा जून महिन्यात 4 ते 9 जून तसेच 23 व 24 जून आणि जुलै महिन्यात 4 ते 7 जुलै आणि 21 ते 24 जुलै असे प्रत्येकी आठ तर,ऑगस्ट महिन्यात 19 ते 22 ऑगस्ट हे चार दिवस असे पावसाळ्यात एकूण 20 दिवस समुद्राला उधाण भरती असून यादिवशी भरतीच्या पाण्याची उंची 4.5 मीटरपेक्षा अधिक असणार आहे. उधाणाची उंची ही लाटेची नसून भरतीच्या पाण्याची असल्याने किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे,यंदा कोरोनासोबतच 26 जुलै 2005 सारख्या पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


उधाणाचे दिवस, वेळ आणि पाण्याची उंची


गुरुवार 4 जून (सकाळी 10:57) - पाण्याची उंची 4.56 मीटर
शुक्रवार 5 जून (सकाळी 11:45) - पाण्याची उंची 4.75 मीटर
शनिवार 6 जून (दुपारी 12:33) - पाण्याची उंची 4.82 मीटर
रविवार 7 जून (दुपारी 1:19) - पाण्याची उंची 4.78 मीटर
सोमवार 8 जून (दुपारी 2:04 ) - पाण्याची उंची 4.67 मीटर
मंगळवार 9 जून (दुपारी 2:48) - पाण्याची उंची 4.50 मीटर
मंगळवार 23 जून (दुपारी 1:43) - पाण्याची उंची 4.52 मीटर
बुधवार 24 जून (दुपारी 2:25) - पाण्याची उंची 4.51 मीटर
शनिवार 4 जुलै (सकाळी 11:38) - पाण्याची उंची 4.57मीटर
रविवार 5 जुलै (दुपारी 12:23) - पाण्याची उंची 4.63मीटर.
सोमवार 6 जुलै (दुपारी 1:06) - पाण्याची उंची 4.62 मीटर
मंगळवार 7 जुलै (दुपारी 1:46) - पाण्याची उंची 4.54 मीटर
मंगळवार 21 जुलै (दुपारी 12:43) - पाण्याची उंची 4.54 मीटर
बुधवार 22 जुलै (दुपारी 1:22) - पाण्याची उंची 4.63 मीटर
गुरुवार 23 जुलै (दुपारी 2:03) - पाण्याची उंची 4.66 मीटर
शुक्रवार 24 जुलै (दुपारी 2:45) - पाण्याची उंची 4.61 मीटर
बुधवार 19 ऑगस्ट (दुपारी 12:17) - पाण्याची उंची 4.61 मीटर
गुरुवार 20 ऑगस्ट (दुपारी 12:55) -पाण्याची उंची 4.73 मीटर
शुक्रवार 21 ऑगस्ट (दुपारी 1:33) -पाण्याची उंची 4.75 मीटर
शनिवार 22 ऑगस्ट (दुपारी 2:14)- पाण्याची उंची 4.67 मीटर


संबंधित बातम्या :