मुंबई : चंद्राचं स्थान हे प्रत्येकाच्या मनात खास असतं. लहानग्यांसाठी तो चांदोबा किंवा चांदोमामा असतो तर प्रेमवीर, शायर यांच्यासाठी तो कविता, शायरीचं प्रेरणास्थान असतो. प्रेयसीच्या चेहऱ्याला चंद्राची उपमा देणारे शायरही कमी नाहीत. 'गली में आज चांद निकला' किंवा 'मैंने पूछा चांद से, के देखा है हँसी, मेरे यार सा हँसी', 'चौदहवी का चांद हो, या आफताब हो' यांसारख्या गाण्यांनी भारतीय चित्रपटप्रेमींना भुरळ पाडली आहे. चंद्राचं आकर्षण आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण वर्षातील अखेरचा सुपरमून आज पाहता येणार आहे.


आजचा चंद्र हा त्याच्या सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा आणि जास्त चमकदार दिसणार आहे. जर तुम्ही आजचा सुपरमून पाहण्याची संधी दवडली तर तुम्हाला यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. आजचा सुपरमून हा या वर्षातील अखेरचा आहे. यानंतर 27 एप्रिल 2021 रोजी सुपरमून पाहण्याचा योग येईल, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.


सुपरमून म्हणजे काय?
याआधी एप्रिल महिन्यात सुपरमून दिसला होता. त्याला 'पिंक मून' नाव देण्यात आलं होतं. अशाच प्रकारे मे महिन्यातील सुपरमूनला 'सुपर फ्लॉवर मून' नाव दिलं आहे. पण सुपरमून म्हणजे नेमकं काय आहे? तो खास का समजला जातो? हे जाणून घेऊया.


सुपरमूनच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या सर्वात जवळ असतो. चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने चंद्र मोठा आणि चमकदार दिसतो. आज दिसणारा सुपरमून चंद्रापासून 3,61 184 किमी अंतरावर असेल. सामान्यत: पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर 3, 84 400 किमी असतं. मात्र प्रत्येक पौर्णिमेला सुपरमून असतोच असं नाही.


दरम्यान, नासासह अनेक वेबसाईटवर सुपरमून ऑनलाईन पाहण्याची सोय करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार आजचा सुपरमून आकाशात दुपारी सव्वाचार वाजल्यापासून दिसायला सुरुवात होईल.